Explainer : HMPV मुळे मृत्यू होता का? कोरोनासारखा धोकादायक आहे का? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

What We Know About HMPV virus : जीवशास्त्रीयदृष्ट्या हा विषाणू कोरोनापेक्षा भिन्न असून, त्याचा मृत्यूदरही अत्यंत कमी आहे. चला तर एचएमपीव्ही कोरोनापेक्षा वेगळा कसा समजून घेऊयात....
What We Know About HMPV virus
What We Know About HMPV virusसंग्रहित छायाचित्र
Published On

सम्राट कदम

सार्स कोव्हिड-२ अर्थात कोरोनाच्या वैश्विक साथीला जेमतेप पाच वर्षही पूर्ण झाले नाहीत. तो पर्यंत ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस अर्थात एचएमपीव्ही विषाणूच्या वैश्विक संसर्गाने जगाचे दरवाजे ठोठावले आहे. चीनमधून उत्पत्ती आणि श्वसनाशी निगडीत आजार असल्याने भारतासह संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. नुकतेच बंगळूर आणि नागपूरातही रूग्ण आढळले असून, केंद्र आणि राज्य सरकारांचे आरोग्य विभागही एक्शन मोडवर आले आहेत. एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गामुळे दिसणारी लक्षणे जरी कोरोनासारखी असली तरी घाबरून जाण्याचे काम नाही. जीवशास्त्रीयदृष्ट्या हा विषाणू कोरोनापेक्षा भिन्न असून, त्याचा मृत्यूदरही अत्यंत कमी आहे. चला तर एचएमपीव्ही कोरोनापेक्षा वेगळा कसा समजून घेऊयात....

एचएमपीव्ही काय आहे?

ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस हा मानवी श्वसनमार्गाला संसर्गित करणारा विषाणू आहे. ज्यामुळे सर्दी- खोकल्यासारखी सौम्य लक्षणे दिसू शकतात. हा विषाणू श्वसनमार्गाच्या वरच्या भागाला (अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक) संसर्ग करतो. ज्यामुळे न्यूमोनियासारखी लक्षणे दिसतात. ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस हा सिंगल स्ट्रेन असलेला आरएनए विषाणू आहे. सार्स कोव्ह गटापेक्षा ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस विषाणूचा गट वेगळा आहे.

What We Know About HMPV virus
HMPV Virus : नागपूरमध्ये HMPV चे २ रुग्ण आढळले, राज्यात लॉकडाऊन लागणार का? महत्वाची माहिती आली समोर

एचएमपीव्हीची पहिलीच साथ आहे का?

नाही. सार्स कोव्हिड-२ ज्याला आपण कोव्हिड १९ म्हणून ओळखतो तो प्रथमच मानवी संपर्कात आला होता. एचएमपीव्हीचे तसे नाही २००१ मध्ये या विषाणूची साथ पसरली होती. अगदी अमेरिकेतही ही साथ पसरल्याचे अमेरिकेच्याच आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे हिवाळ्यात याच विषाणूशी साधर्म्य असलेली आरएसव्ही विषाणूची साथ येत असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान चीनच्या आरोग्य विभागाने हे देखिल स्पष्ट केले आहे की, चीनमध्ये प्रथमच या विषाणूचा संसर्ग झालेले नाही. तर वर्षभर हा संसर्ग आढळतो. मात्र गेल्या काही दिवसांत बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे कोव्हिड १९ सारखा हा विषाणू जगाला नवीन नाही. या आधी देखील त्याने लोक बाधित झाले होते. हा एक प्रकारचा मोसमी (सिजनल) संसर्ग आहे.

कोरोना आणि एचएमपीव्हीत साधर्म्य् काय?

फार तर लक्षणांच्या बाबतीत आपण बोलू शकतो. आतापर्यंत जी लक्षणे समोर आली आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकला, सोम्य ताप, अंगदुखी, काही रूग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे सामान्यतः जाणवू शकतात. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध लोकांमध्ये लक्षणांची तीव्रता जास्त असू शकते. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रमाणेच प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करावे लागतील. ज्यामध्ये हात साबणाने स्वच्छ धुणे, चेहरा किंवा डोळ्यांना सारखा हात न लावणे, लक्षणे दिसत असल्यास मास्क वापरणे आदींचा अवलंब करावा लागणार आहे.

एचएमपीव्हीचा सर्वाधिक धोका कुणाला?

कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वच वयोगटातील लोकांना व्हायचा. तसेच त्यामुळे गंभीर आजार किंवा मृत्यूही सर्वच वयोगटातील लोकांचा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या विषाणूचे तसे नाही प्रामुख्याने लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती किंवा गरोदर मातांमध्ये या आजाराच्या लक्षणांचे प्रमाण अधिक जाणवू शकते. आपल्याला एक लक्षात घ्यायला हवे की, प्रत्येक देशात किंवा भागानूसार आजाराची लक्षणे आणि तिव्रता कमी जास्त होते. भारतात नुकतेच काही रूग्ण आढळले असून, लक्षणांच्या तीव्रतेसाठी आपल्याला अजूनही अपडेटची वाट पाहावी लागेल. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी मंगळवारी (ता.७) संध्याकाळी एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आजाराच्या प्रसारासंबंधी माहिती दिली आहे. त्यात त्यांनी भारतात रूग्ण आढळल्याचे सांगितले आहे. त्याचवेळी सर्व वयोगटांतील लोकांना विषाणूचा संसर्ग होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. अमेरिका, चीन आणि इतर देशांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी हे सांगितले. कोरोनासारखे या विषाणूला घाबरून न जाता आवश्यक खबरदारी घ्या, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

एचएमपीव्ही विषाणूचा प्रसार कसा होतो?

शिंक किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून, डोळ्यातील पाणी ही विषाणूच्या प्रसाराची मुख्य माध्यमे आहेत. तसेच बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आले, त्याला हास्तांदोलन केले. त्यानंतर चेहरा, नाक किंवा डोळ्यांना स्पर्ष केला तर संसर्ग होऊ शकतो.

लक्षणे किती दिवसांत दिसतात?

कोव्हिड १९ सारखा या विषाणूचा १५ दिवसांचा कालावधी नाही. साधारणपणे बाधित झाल्यानंतर तीन ते १० दिवसांच्या आत लक्षणे दिसतात आणि अवघ्या दोन ते पाच दिवसांत व्यक्ती बरी होते. अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ३ ते ६ दिवसांत हा आजार बरा होतो.

एचएमपीव्ही मुळे मृत्यू होता का?

कोरोनाच्या तुलनेत एचएमपीव्हीचा मृत्यूदर फारच कमी आहे. बाधित असलेल्या व्यक्तीला इतर आजार असेल किंवा त्याची रोगप्रतिकारशक्तीच फार कमी असेल तर एखादा रूग्ण दगाऊ शकतो. असे चीनच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोरोना सारखा हा रोग घातक नाही.

हा सर्वसामान्य आजार आहे का?

आजपर्यंतचा डेटा पाहता अमेरिकेत आणि चीनमध्ये श्वसनाचा आजार असलेल्या १२ पैकी १० मुलांमध्ये हा एचएमपीव्ही आजार दिसला आहे. वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत अनेक मुलांना हा आजार होऊन गेल्याचे चीनच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

कोरोना आणि एचएमपीव्हीत फरक काय?

लक्षणे जरी सारखी असली तरी गंभीर आजारी आणि मृत्यू होण्याचे प्रमाण फारच कमी. कोरोना सारखा हा आजार जगाला नवीन नाही. बहुतेक लहान मुलांना हा आजार होऊन गेलेला आहे. फक्त आता अशा रूग्णांचे निदान अथवा बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दुसरं म्हणजे अमेरिका आणि चीन या देशात हिवाळ्याच्या शेवटी हा मौसमी आजार मुलांमध्ये आढळतो.

यावर लस आहे का?

हा मोसमी आजार असून, सामान्यतः परदेशात जास्त आढळतो. सौम्य लक्षणे आणि योग्य आहार घेतल्यास अनेक रूग्ण बरे होतात. त्यामुळे आजवर एचएमपीव्ही संसर्गासाठी लस निघालेली नाही. बाधितांची संख्या वाढल्यास लवकरत लस येऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

आपण काय करावे?

हा आजार जीवघेणा नाही, एवढं पक्के. त्यामुळे आवश्यक प्रतिबंधात्मक उपयांचे पालन करावे. जर काही लक्षणे दिसले तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उत्तम आहार आणि औषधे घेऊन लवकर बरे व्हावे. आरोग्य विभागाने अधिकृत केलेल्या माहिती आणि सूचनांचेच तंतोतंत पालन करा. अराजकता किंवा खोट्या माहितीपासून सावध राहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com