

पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय
छातीतील टिश्यूमधून ट्यूमर तयार होतो
सुरुवातीची लक्षणं सौम्य आणि दुर्लक्षित होतात
ब्रेस्ट कॅन्सर म्हटलं की तो फक्त महिलांना होतो असा आपला समज आहे. मात्र नुकतंच अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर परिसरात राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलंय.
न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालानुसार, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेन्शनने 2024 पर्यंत 91 पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजेच ही संख्या 2018 मध्ये नोंदवलेल्या रुग्णसंख्येपेक्षा सहापट जास्त आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा तब्बल 90 पट जास्त असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती फारच चिंताजनक आहे. याचं कारण म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हा पुरुषांमध्ये फार दुर्मिळ प्रमाणात आढळतो. सामान्यतः दर पाहिला तर एक लाख पुरुषांमध्ये केवळ एक पुरुष या आजाराने प्रभावित असतो.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेस्ट कॅन्सर ही केवळ महिलांनो होणारी समस्या नाही. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात जन्मतःच थोड्या प्रमाणात ब्रेस्ट टिश्यू असतात. हे टिश्यू काही वेळा असामान्य पद्धतीने वाढू लागतात. मायो क्लिनिकच्या माहितीनुसार, पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात छातीतील टिश्यूच्या पेशींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे होऊ लागते. या बदललेल्या पेशी हळूहळू वाढत जातात आणि कालांतराने गाठ किंवा ट्यूमरचं रूप धारण करतात.
ही समस्या मुख्यतः 60 ते 70 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये दिसून येते. परंतु आजकाल ही समस्या कोणत्याही वयातील पुरुषांमध्ये दिसून येते. CDC आणि मायो क्लिनिकच्या अभ्यासानुसार, आजाराचा धोका काही विशिष्ट कारणांमुळे वाढताना दिसतो. यामध्ये वाढते वय, हार्मोनल असंतुलन किंवा एस्ट्रोजन थेरपी, कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, लिव्हरचे आजार, लठ्ठपणा, अंडकोषाशी संबंधित आजार किंवा शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो.
पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा सौम्य स्वरूपाची असतात. त्यामुळे या लक्षणांकडे पुरुष सहजरित्य दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, छातीवर वेदनारहित गाठ किंवा सूज, त्वचेवर सुरकुत्या, लालसरपणा किंवा रंग बदलणं, निप्पलचा आकार बदलणं, निप्पलमधून द्रव किंवा रक्तस्त्राव होणं आणि बगल किंवा कॉलरबोनच्या आसपास सूज येणं ही काही सामान्य लक्षणं मानली जातात. ही लक्षणे बरेच दिवस दिसून आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
या आजाराचा पूर्णपणे प्रतिबंध करणं शक्य नसलं तरी काही उपाययोजना करून त्याचा धोका कमी करता येतो. डॉक्टरांच्या मते, जर कुटुंबात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास असेल तर जेनेटिक टेस्टिंग करून घेतली पाहिजे. याशिवाय वजन नियंत्रणात ठेवणं, मद्यपान मर्यादित करणं आणि नियमितपणे स्वतःची छाती तपासणं हे अत्यंत आवश्यक आहे.
पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो का?
होय, पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो.
ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवात कशी होते?
छातीतील टिश्यूमध्ये पेशी बदलून होते.
सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात?
गाठ, सूज, निप्पलमधून स्त्राव दिसतो.
कोणते घटक ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवतात?
वय, हार्मोन, लठ्ठपणा आणि अनुवंशिकता कारणीभूत असतात.
प्रतिबंधासाठी काय उपाय करता येतील?
वजन नियंत्रण, जेनेटिक टेस्ट आणि नियमित तपासणी आवश्यक
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.