जळगाव : अळूच्या पानांची भजी म्हणा की पोथीच्या पानांची भजी अर्थातच नवापूरचे पात्रे. विशेषप्रसंगी नाश्त्याला किंवा भाजीसाठी तयार केले जात असत. मराठमोळ्या चुलीवर तयार होणारे पात्रे घरातून थेट हॉटेलच्या काउंटरवर पोचले आणि खवय्यांच्या पसंतीस उतरले. एवढे आवडते झाले, की रोजच्या नाश्त्यामध्ये आवश्यक झाले. नवापूरमधून गुजरातला गेले, तेथेही खवय्यांच्या जिभेवर ताबा मिळविला. आज गुजराती पदार्थ म्हणून ओळखला जाणारा पात्रा मुळात नवापूरचाच आहे. नवापूरहून बारडोलीला गेला आणि नावारूपाला आला असा इतिहास असलेल्या या पात्रांनी नवापूर शहराची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. (jalgaon-news-patra-known-as-Gujarati-food-is-from-Navapur-in-Maharashtra)
नवापूर तालुक्यात अळूच्या पानांचे उत्पादन बऱ्यापैकी होते. घरी विशेष प्रसंगाला अथवा कधीतरी अळूच्या पानांची भजी मिळायची. मात्र नवापूरमधील हॉटेल व्यावसायिकांनी कांदा भजी, खमण, सामोसे, गाठीशेव, शेव चिवडा या रोजच्या नाश्त्यामध्ये अळूच्या भजीचा समावेश केला; ज्याचे नाव पात्रा ठेवले. घरच्या अळूच्या पानांच्या भजीपेक्षा हॉटेलच्या भजीला कडक आणि रुचकर चव असल्याने लोकांच्या पसंतीला उतरली.
४५ दिवस टिकतो पात्रा
महाराष्ट्र व गुजरात राज्य संयुक्त होते. नवापूर शहरात गुजराथी समाज मोठ्या प्रमाणावर असल्याने गुजराती संस्कृती व परंपरांनी मराठी मनावर अधिराज्य केले होते. नाश्त्यात अळूच्या भजीला पात्रा नाव प्रचलित झाले. खमण– पात्रा जोडीला प्रथम प्राधान्य आजही आहे. खमण बनविल्यानंतर लगेच एक- दोन तासांत संपविले पाहिजे. खमणचे आयुष्य केवळ एक दिवस. मात्र पात्रे तयार केल्यानंतर ४५ दिवस राहतात. पात्रे जास्त दिवस राहण्यासाठी तयार करताना कुठल्याही प्रकारचा रासायनिक घटक मिश्रण केला जात नाही, हे याचे वैशिष्ट्य आहे. कडक असल्याने जास्त दिवस खाण्याजोगा असतो. त्यामुळे कुठेही पार्सल पाठविता येते. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, गुजरात राज्यासह परदेशात विशेष मागणी असल्याने पात्र्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात करण्यात येते.
गुजरातमध्ये असा पोहचला पात्रा
नवापूर शहरात चार- पाच दशकांपूर्वी हॉटेलच्या व्यवसायात चुनीलाल पंचोली पात्रावाला, वडावाला, मनीषभाई चव्हाण यांचा नवापूर शहरात हॉटेल व्यवसाय होता. मनीषभाई चव्हाण यांनी सुरवातीला हा व्यवसाय नवापूर शहरात केला. त्यांच्या हॉटेलमधील पात्रे प्रसिद्ध होते. काही कारणास्तव त्यांनी नवापूर शहर सोडून गुजरातमधील बारडोली येथे आपले बस्तान मांडले. बारडोली रेल्वेस्थानकासमोर एका छोट्याशा टपरीत नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला. इतर पदार्थांसोबत त्यांनी पात्रे ठेवले. त्यांच्या पात्र्यांना अल्पावधीत लोकांची पसंती मिळाली. चव्हाण यांचा पात्रा इतर हॉटेलच्या काउंटरवर पोचला आणि अल्पावधीतच लोकप्रिय झाला. बारडोली परिसरातील बहुतेक जण परदेशात स्थायिक आहेत. त्यांच्या नाश्त्यामध्ये आजही पात्राची जागा कायम आहे. त्यामुळे ते नेहमी पात्रे पार्सल मागवत असतात. त्यामुळे आज जरी पात्रे गुजराथी नाश्ता म्हणत असतील तरी मूळ संकल्पना ही नवापूरचीच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.