
देशभरात हार्ट अटॅकची प्रकरणं वाढताना दिसतायत. दर मिनिटाला देशात एक हार्ट अटॅकच्या प्रकरणाची नोंद होत असल्याचं पाहायला मिळतंय. भारतात अनेक लोक जीव वाचवणारे उपचार मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वेळ गमावतात. दिल्लीतील एम्स रूग्णालयाचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एस. रामक्रिश्नन यांच्या मते, "गोल्डन अवर" समजून घेतल्यास जीवन आणि मृत्यू यांच्यातील फरक कळू शकतो.
गोल्डन अवर म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं जसं की छातीत दुखणं, अस्वस्थता किंवा छातीत जडपणा दिसून आल्यानंतरचा पहिला तास. जेव्हा एखाद्याला छातीत दुखणं, छातीत जडपणा जाणवणं, हात किंवा जबड्यात दुखणं, घाम येणं किंवा धाप लागणे यांसारखी लक्षणे जाणवतात, तेव्हा त्यांनी वाट पाहू नये किंवा स्वतःच निदान करण्याचा प्रयत्न करू नये. या व्यक्तींनी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. ही मदत शक्यतो गोल्डन अवरमध्ये मिळणं गरजेचं आहे. या 60 मिनिटांच्या वेळामध्ये रक्ताभिसरण वेळेत पूर्ववत झाल्यास रूग्णाचे प्राण वाचवता येऊ शकतात.
डॉ. रामक्रिश्नन यांनी IndiaToday ला सांगितलं की, "अशावेळी वेळ म्हणजे जीवन आहे आणि time is muscle. त्यामुळे जितक्या लवकर एखाद्या व्यक्तीला उपचार मिळतील, तितकी हृदयाचं कायमचं नुकसान कमी किंवा मर्यादित होण्याची शक्यता जास्त असते."
हृदयविकाराचा झटका ज्यावेळी येतो जेव्हा हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवणारी रक्तवाहिनी अचानक ब्लॉक होते. सामान्यपणे रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गुठळ्यामुळे ही परिस्थिती उद्भवते. हा अडथळा हृदयाच्या स्नायूंच्या एका भागाला ऑक्सिजनयुक्त रक्ताचा प्रवाह थांबवतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, हृदय हे शरीरातील इतर कोणत्याही स्नायूप्रमाणे आहे. त्याला योग्यरित्या कार्य करण्यासाठी ऑक्सिजनचा सतत पुरवठा गरजेचा आहे. ज्यावेळी हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही. तेव्हा समस्या निर्माण होऊ शकतात.
डॉ. रामक्रिश्नन म्हणाले, "एकदा धमनी ब्लॉक झाली की, त्या धमनीवर अवलंबून असलेला हृदयाच्या स्नायूंचा भाग मरू लागतो. जर रक्ताभिसरण लवकर पहिल्याप्रमाणे झालं नाही, तर नुकसान कायमचं होऊ लागतं."
हृदयविकाराच्या सुरुवातीच्या मिनिटांत, हृदयाचे बहुतेक स्नायू कार्यरत असतात आणि त्यांना वाचवता येणं शक्य असतं. जर या पहिल्या तासात गाठ विरघळवणारं औषध दिलं किंवा आपत्कालीन उपचार केले गेले, तर हृदयाचे स्नायू वाचण्याची शक्यता खूप जास्त असते. मात्र प्रत्येक तासागणिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता असते. यामध्ये सुमारे सहा तासांनंतर, हृदयाचे बरेच स्नायू कायमचे खराब होण्याचा धोका असतो, असं ते म्हणाले.
थ्रोम्बोलिसिस (Thrombolysis) – यामध्ये गाठ विरघळवणारी औषधं देऊन अडथळा दूर केला जातो.
प्रायमरी पीसीआय (Primary PCI) (अँजिओप्लास्टी) – ब्लॉक झालेली धमनी यांत्रिकरित्या उघडण्यासाठीची प्रक्रिया यामध्ये केली जाते.
"भारतात दरवर्षी ३५ लाखांहून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका येतो. मात्र यावेळी केवळ २५% लोकांना वेळेवर गाठ विरघळवणारी औषधं मिळतात आणि फक्त ५% लोकांची अँजिओप्लास्टी होते. याचा अर्थ जवळपास ७५% लोक उपचारांविना राहतात, असंही त्यांनी नमूद केलं.
डॉ. रामकृष्णन यांनी इशारा दिलाय, भारतीय लोक सरासरी, छातीत दुखायला लागल्यानंतर ८-१२ तासांनी रुग्णालयात पोहोचतात. ज्यामुळे गोल्डन अवरचा कालावधी उलटून गेलेला असतो. जर आपण रुग्णांना पहिल्या तीन तासांत रुग्णालयात पोहोचवू शकलो तर आपण नुकसान लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
छातीत दुखणे, डाव्या हाताला वेदना होणे, घाम येणे, मळमळणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही लक्षणं तुम्ही ओळखली पाहिजेत.
त्रास होत असल्यास वाट पाहू नका. यावेळी त्वरित मदत मिळवा, प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे.
शक्यतो हृदयविकारावर उपचार करण्यासाठी सुसज्ज असलेल्या रुग्णालयात जा. जेणेकरून तुमच्यावर योग्य उपचार होऊ शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.