Breast Cancer Treatment: ब्रेस्ट कॅन्सरचा महिलांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? उपचारानंतरही जाणवतात या समस्या

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार पूर्ण झाल्यानंतरही महिलांना मानसिक ताण, आजार पुन्हा होण्याची भीती, नातेसंबंधांतील अडचणी आणि आर्थिक चिंता जाणवू शकतात. या समस्यांचा दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो, उपचारानंतर कोणती काळजी घ्यावी आणि तज्ज्ञांची मदत कधी घ्यावी, जाणून घ्या.
Breast Cancer Treatment
Breast Cancer Treatmentsaam tv
Published On: 

ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर महिलांना केवळ शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो असं नाही तर त्यांच्या मानसिक आरोग्यावर, नातेसंबंधांवर आणि कामावरही परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे, कॅन्सरवरील मुख्य उपचार पूर्ण झाल्यानंतरही अनेक महिलांना या समस्यांचा सामना करावा लागतो. कॅन्सर पुन्हा होण्याची भीती, शरीरात झालेल्या बदलांमुळे कमी झालेला आत्मविश्वास, कुटुंबाची जबाबदारी आणि आर्थिक चिंता यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो.

डॉ. सुलतान प्रधान, अध्यक्ष आणि वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (HNCII) यांच्या मते, स्तनाच्या कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतरही महिलांच्या आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आजाराची स्पष्ट लक्षणं दिसत नसली तरी मनात निर्माण होणारी भीती आणि इतर समस्या त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतात.

कॅन्सर पुन्हा होण्याची भीती

ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचार पूर्ण झाल्यानंतरही अनेक महिलांना हा आजार पुन्हा होईल का, अशी भीती वाटत राहते. नियमित तपासणी किंवा स्कॅन करण्याची वेळ आली की ही चिंता वाढू शकते. काही वेळा शरीरात विनाकारण वेदना जाणवल्या, तरी महिलांना कॅन्सर पुन्हा झाल्याची भीती वाटू शकते.

मात्र, शरीरात वेदना जाणवणं किंवा एखादं नवीन लक्षण दिसणं म्हणजे कॅन्सर पुन्हा झाला आहे, असं नाही. अशा अनेक लक्षणांचा कॅन्सर पुनरागमनाशी संबंध नसतो. तरीही शरीरात काही असामान्य बदल जाणवत असतील किंवा एखादा त्रास सतत होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्याच वेळी, प्रत्येक त्रास हा कॅन्सरमुळेच होत आहे असंही समजू नये. अशा वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

उपचारानंतर कोणत्या तपासण्या कधी करायच्या आणि कोणती लक्षणं दिसल्यास डॉक्टरांशी संपर्क साधायचा, याची माहिती महिलांना असणे गरजेचं आहे. त्यामुळे शरीरात होणारे सामान्य बदल समजून घेण्यास आणि गरज पडल्यास योग्य वेळी वैद्यकीय मदत घेण्यास मदत होते.

Breast Cancer Treatment
Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

पती-पत्नीच्या नात्यावरही होऊ शकतो परिणाम

ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारांचा परिणाम महिलांच्या वैवाहिक आयुष्यावर आणि पतीसोबतच्या जवळ झाल्यानंतर होऊ शकतो. मात्र या विषयावर अनेकदा उघडपणे बोललं जात नाही. कॅन्सरवरील शस्त्रक्रियेमुळे स्तनाच्या आकारात किंवा दिसण्यात बदल होऊ शकतो. तसंच, केमोथेरपी आणि हार्मोनल उपचारांमुळे थकवा जाणवणं, योनीमार्गात कोरडेपणा येणं किंवा लैंगिक इच्छा कमी होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

या बदलांमुळे महिलांना स्वतःच्या शरीराविषयी संकोच वाटू शकतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. काही वेळा याचा परिणाम पती-पत्नीमधील भावनिक जवळीक आणि शारीरिक संबंधांवरही होतो.

या समस्या उपचार प्रक्रियेचाच एक भाग असू शकतात. त्यामुळे त्याबद्दल बोलण्यास संकोच करू नये. महिलांनी आपल्या अडचणी ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कर्करोगाच्या उपचारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांशी किंवा योग्य संबंधित तज्ज्ञांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. यामुळे नेमकी समस्या समजून घेता येते आणि त्यावर योग्य उपाय शोधता येतात.

नोकरी आणि आर्थिक परिस्थितीवरही परिणाम

ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार अनेक महिने सुरू राहू शकतात. या काळात वारंवार रुग्णालयात जावं लागतं. काही महिलांना शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन उपचार घ्यावे लागतात. उपचारांमुळे होणारा थकवा आणि इतर त्रास यांचा परिणाम रोजच्या कामावर होऊ शकतो.

Breast Cancer Treatment
Heart Transplant: वाडिया रुग्णालयात पहिल्यांदाच यशस्वी हृदय प्रत्यारोपण, 17 वर्षीय मुलाला नवं आयुष्य; ग्रीन कॉरिडॉरमुळे 25 मिनिटांत पोहोचलं हृदय

काही महिलांना कामावरून दीर्घकाळ रजा घ्यावी लागते तर काहींना कामाच्या वेळेत बदल करावे लागतात. घरातील आर्थिक जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांसाठी ही परिस्थिती अधिक कठीण ठरू शकते. कामापासून दूर राहावं लागल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच आजाराचा सामना करणाऱ्या महिलांवर आर्थिक ताणही वाढू शकतो.

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका

ब्रेस्ट कॅन्सरचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. उपचार सुरू असताना किंवा उपचार पूर्ण झाल्यानंतरही काही महिलांना सतत चिंता वाटणं, झोप न लागणं, उदास वाटणं किंवा एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं अशा समस्या जाणवू शकतात.

कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर निर्माण झालेला मानसिक ताण, उपचारांचे दुष्परिणाम आणि दैनंदिन जीवनात झालेले बदल यांमुळे अशा समस्या उद्भवू शकतात.

Breast Cancer Treatment
Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

या समस्या काही काळानंतर कमी होऊ शकतात. मात्र, त्या दीर्घकाळ कायम राहिल्या किंवा रोजच्या कामात अडथळा निर्माण करू लागल्या, तर डॉक्टरांशी बोलणं गरजेचं आहे. या त्रासासोबत कायम जगावं लागेल किंवा त्याची सवय करून घ्यावी लागेल, असं समजू नये. योग्य वेळी मदत घेतल्यास या समस्यांवर उपाय शोधता येऊ शकतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com