
हिवाळा म्हणजे थंड हवा. हिवाळ्यात वातावरण मोठ्या प्रमाणात थंड होते. त्यामुळे तुमचे शरीर सुद्धा कोरडे पडते. तसेच जास्त वेळ थंड हवेत फिरल्याने तुम्हाला थंडी, ताप, सर्दी या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र ज्या लोकांना रोज कामानिमित्त प्रवास करावा लागतो. त्यांना हा त्रास सगळ्यात जास्त वेळ सहन करावा लागतो. अशा वेळेस नाक चोंदते, किंवा सतत नाक गळते. आता या समस्यांवर आम्ही काही घरगुती उपाय आणले आहेत. त्याचा वापर नियमित केल्याने तुम्हाला हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून लांब राहता येईल.
आल्याचा चहा
आल्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आले, गवती चहा, लवंग, आणि मध घालून गरम चहा प्यायल्याने सर्दीत आराम मिळतो.
तुलशीचा काढा
तुलशीची पाने उकळून त्यात आलं, लिंबाचा रस, मध किंवा गूळ मिसळून तयार केलेला काढा सर्दीवर गुणकारी असतो.
हळदीचे दूध
गरम दुधात हळद आणि चिमूटभर काळी मिरी घालून प्यायल्याने शरीरातील विषाणूंचा नाश होतो आणि प्रतिकारशक्ती वाढते.
वाफ घेणे
गरम पाण्यात मीठ किंवा विक्स घालून वाफ घेतल्याने सर्दी आणि बंद नाक मोकळं होतं.
मध आणि दालचिनी
एक चमचा मधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून सेवन केल्यास सर्दीत आराम मिळतो आणि घसा मोकळा होतो.
गरम पाणी पिणे
हिवाळ्यात थंड पाणी टाळावे. दिवसातून अनेकदा कोमट पाणी प्यायल्याने घशातील जंतू मरतात आणि शरीर हायड्रेट राहते.
लसूण
लसूणमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते सर्दी आणि खोकल्यावर उपयुक्त ठरते. लसणाची पेस्ट तयार करून तूपात परतून खाल्ल्यास फायदा होतो.
फळे आणि भाज्या
सर्दीत व्हिटॅमिन-सीयुक्त फळे जसे संत्री, आवळा, आणि पालेभाज्या खाणे प्रतिकारशक्ती वाढवते.
व्यायाम आणि विश्रांती
हलका व्यायाम आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने शरीर तंदुरुस्त राहते आणि सर्दी लवकर बरी होते.
मीठाच्या पाण्याने गुळण्या
कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने घशातील खवखव कमी होते आणि जंतूंचा नाश होतो.
टिप्स
घरगुती उपायांसोबतच गरम उबदार कपडे घालणे आणि शरीर गरम ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्दी सातत्याने होत असल्यास किंवा ५-७ दिवसांनंतरही आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हे उपाय नैसर्गिक असल्याने कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि ते सहज घरी करता येतात. हिवाळ्यात सर्दी टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By: Sakshi Jadhav