

आपण बहुतेक वेळा 'ब्लड शुगर' म्हणजेच रक्तातील साखरेच्या पातळीबद्दल विचार करताना लगेच जेवणाकडे लक्ष देतो. मात्र, काही वेळा आपण काही खाल्लं नसतानाही रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढलेली आढळते. यामागे काही लपलेली कारणं असतात जी आपल्या शरीरावर थेट परिणाम करतात. पुढे आपण याबद्दल सोप्या भाषेत थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
वॉकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथील एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट डॉ. प्रणव घोडे यांच्या मते, ताण, अपुरी झोप, व्यायाम, संसर्ग आणि हार्मोनल बदल हे असे पाच घटक आहेत जे रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतात.
ताण वाढल्यामुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचं हार्मोन स्रवायला लागतं. हे हार्मोन लिव्हरला साठवलेले ग्लुकोज सोडायला प्रवृत्त करतं. जे शरीराला तातडीच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी उपयुक्त ठरतं. मात्र रोजच्या मानसिक ताणाखाली हे परिणाम शरीरासाठी घातक ठरतात. तसेच अपुरी झोप सुद्धा शरीराला तात्पुरती इन्सुलिन-रेझिस्टंट बनवते. म्हणजेच शरीरातील ग्लुकोज पेशींमध्ये शोषलं न जाता रक्तातच जास्त काळ राहतं. त्यामुळे एका रात्रीची अपुरी झोपही ब्लड शुगर वाढवू शकते.
व्यायाम सुद्धा रक्तातील साखरेत तात्पुरता बदल घडवतो. विशेषतः जास्त किंवा रेसिस्टन्स ट्रेनिंगदरम्यान शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज सोडते. त्यामुळे तात्पुरता शुगर लेव्हल वाढतो, मात्र तो नियंत्रणात राहतो आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
संसर्ग किंवा आजारपणाच्या काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कार्यरत राहण्यासाठी जास्त उर्जा (ग्लुकोज) वापरते. त्यामुळे त्या काळात ब्लड शुगर वाढू शकतो. तसेच, हार्मोनल बदल विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळी, पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या काळात शरीर इन्सुलिनसाठी कमी संवेदनशील होतं, ज्यामुळे साखरेत चढ-उतार होतो.
४० ते ५० वयोगटातील महिलांनी आपल्या वजनात, ऊर्जेत किंवा मूडमध्ये जाणवणारे बदल गांभीर्याने घ्यावेत. कारण हे हार्मोनल बदल ब्लड शुगरवर परिणाम करतात.
उपाय काय?
ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी ध्यान, योगासारख्या रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर करा. चांगली झोप आणि नियमित व्यायामाचं वेळापत्रक ठेवा. हार्मोनल किंवा सततच्या ब्लड शुगर समस्यांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
टीप : या लेखातील माहिती सार्वजनिक स्त्रोत आणि तज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कोणतेही उपचार किंवा आरोग्यविषयक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.