

काही रक्तगटांमध्ये कोलेस्टेरॉल आणि क्लॉटिंग फॅक्टरची पातळी जास्त असते.
अभ्यासानुसार A, B आणि AB रक्तगटाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक असतो.
हृदयाचं आरोग्य टिकवण्यासाठी आहार आणि व्यायाम महत्त्वाचे घटक ठरत असतात.
आरोग्य उत्तम ठेवण्यात आणि रोगाचा धोका कमी करण्यात रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चार मुख्य रक्तगट आहेत - A, B, AB आणि O. दरम्यान एखाद्या व्यक्तीचा रक्तगट हा त्याच्या पालकांकडून मिळत असतो. हे ABO जनुकावर अवलंबून असते. वाचक मित्रांनो, रक्तगट आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा संबंध आहे. २०१२,२०१७ आणि २०२० मध्ये या बाबत अभ्यास करण्यात आलाय. यात काही रक्तगट हृदयविकाराच्या उच्च जोखमीशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलंय.
२०१२ मध्ये झालेल्या एका अभ्यासात २० वर्षांचा डेटा गोळा करण्यात आला होता. यात रक्तगट O च्या तुलनेत AB, B आणि A मध्ये हृदयविकाराचा धोका २३टक्के, ११ टक्के आणि ५% जास्त होता. तर २०१७ मध्ये केलेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले की, O रक्तगट वगळता इतर सर्व रक्तगटांना हृदयविकाराचा धोका ९टक्के जास्त होता. जानेवारी २०२० मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, रक्तगट A आणि B असलेल्यांना O रक्तगटाच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका ८ टक्के आणि १० टक्के जास्त असतो.
संशोधकांच्या मते, O रक्तगट नसलेल्या लोकांमध्ये म्हणजेच A, B, AB रक्तगटांमध्ये व्हॉन विलेबँड फॅक्टर आणि फॅक्टर VIII सारखे रक्त गोठण्याचे घटक जास्त असतात. तर O रक्तगट असलेल्या लोकांच्या शरिरात हे फॅक्टर कमी असतात. दरम्यान हे घटक रक्ताच्या धमन्यांमध्ये जमतात ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असतात.त्यामुळे रक्तवाहिन्या बंद किंवा ब्लॉक होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत असतो. याशिवाय या रक्तगटांना जळजळ किंवा सूज होण्याचा धोका जास्त असतो.
पण वाचक मित्रांनो, तुमच्या रक्तगटापेक्षा, तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन सवयी हृदयरोगांना कारणीभूत ठरतात. म्हणून तुमच्या जीवनशैली आणि आहाराची विशेष काळजी घ्या. उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि रक्तदाब हे हृदयविकाराच्या झटक्यांसाठी कारणीभूत घटक आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन करत नाहीत. त्यामुळे कोणताही शारिरिक त्रास जाणवला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.