
हिवाळा सुरू झाला असून थंडी जाणवायला लागली आहे. अशावेळी सकाळी नाश्त्यात किंवा संध्याकाळी चहासोबत काहीतरी गरम, चविष्ट झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. मात्र रोज बाहेरचे तळलेले पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक ठरतं. अशावेळी घरच्याघरी बनवण्यासाठी काहीतरी सोप्पा पदार्थ आपण शोधत असतो.
इडली, डोसा, पोहे, उपमा अशा नेहेमीच्या पदार्थांपेक्षा वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा आपल्याला होते. त्यासाठी आज हिवाळ्यात पौष्टिक असलेली गव्हाच्या पिठाची उकड पेंढीची रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. घरातल्या मोजक्या साहित्यात बनून तयार होणारा हा पदार्थ खायला देखील अत्यंत चविष्ट आणि झणझणीत लागतो
उकड पेंढी बनवण्याची कृती
सर्वप्रथम गव्हाचे पिठ तेल टाकून मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे. भाजून झालेले पीठ बाजूला काढून घ्यावे. नंतर पॅनमध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी तयार करावी. त्यात शेंगदाणे, मिरची घालून परतून घ्यावे.
मिरची परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता टाकावा. कांदा शिजून त्याला सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यावा.
त्यानंतर त्यात हळद आणि मिठ घालावे. तोवर एकीकडे भांड्यात पाणी गरम करून घ्यावे. हे गरम पाणी कांद्याच्या मिश्रणात टाकावे. या मिश्रणाला उकळी आल्यावर यात भाजून घेतलेले गव्हाचे पीठ टाकून एकजीव करावे.
नंतर त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. 2 ते 3 मिनिटांसाठी वाफ भरल्यानंतर मऊ लसलुशीत उकड पेंढी तयार होते. त्यावर कोथिंबीर, लिंबू टाकून ही उकड खाता येते. अगदीच काही नाही तर लोणच्यासोबत देखील ही उकड पेंढी खाल्यास चविष्ट लागते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.