
पालक हा कोणत्याही ऋतूत मिळतो. पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. काही जण त्याची भाजी करतात, काही जण पालक पुरी करतात, तर काही जण पालक पनीर करतात. मात्र या सगळ्यासोबत काही तरी खायला लागतं. जसं की, पालक पुरी सह भाजी, पालक पनीरसोबत फुलके किंवा चपाती. मग आपण पालक बनवणे शक्यतो टाळतो. पण तुम्ही कधी पालक राईस खाल्लाय का? हा चवीला उत्तम आणि झटपट होणारा पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊ रेसिपी.
पालक राईस बनवण्याचे साहित्य
250 ग्रॅम पालक
2 वाटी तांदूळ
3-4 हिरव्या मिरच्या
7-8 लसूण पाकळ्या
1-1.5 इंच अदरक
2 टेबलस्पून खोबर किस
1 टेबलस्पून कोथिंबीर
4-5 काळी मिरी
4-5 लवंगा
2 दालचिनी
1 तेजपान
3-4 टेबलस्पून साजुक तुप
1 टेबलस्पून जिरं
1 टेबलस्पून मिर्चीपूड
1/2 टीस्पून गरम मसाला
1/2 टीस्पून गोडा मसाला
1/2 टीस्पून बिर्याणी मसाला
काजू बदाम आवडीनुसार
पालक राईस तयार करण्याची कृती
सर्वप्रथम तांदूळ ३ ते चार वेळा धुवून घ्या. मग ते अर्धातास भिजत ठेवा. मग त्यातले पाणी काढून घ्या. आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. त्यात २ चमचे साखर मिक्स करा. त्यानंतर त्यात पालक अॅड करा.
१ ते दोन मिनिटांनी पालक लगेच बाहेर काढून थंड पाण्यात ठेवा. त्यामुळे तुमच्या राईसला हिरवा रंग येईल. आता कोथिंबीर, जीरे, लसूण, आले आणि ओले खोबरे एका मिक्सरमध्ये पेस्ट करा.
आता एक पातेलं घ्या. त्यात तूप, मीठ पाणी अॅड करून भात शिजवून घ्या. तो पर्यंत पालकची सुद्धा प्युरी करून घ्या. आता फोडणी द्यायला सुरुवात करा.
एक पातेलं घ्या. त्यात तूप गरम करा. मग सुकामेवा छान परता. मग त्यात जीरे, मिरी, लवंग, दालचिनी आणि तयार केलेले लसुण-अद्रकचे वाटण परता. त्याचा रंग बदलला की त्यात आवश्यक मसाले अॅड करून पुन्हा परतून घ्या.
मग त्यात पालकची प्युरी अॅड करा. त्यावर झाकण ठेवून दोन मिनिटे वाफ काढून घ्या. शेवटी त्यात सुकामेवा अॅड करून गरमागरम पालक राईस सर्व्ह करा.
Written By: Sakshi Jadhav