डोळ्यांतून सतत पाणी येणे सामान्य समस्या नाही
डोळ्यांतून पाणी येण्यासोबत खाज, जळजळ, लालसरपणा, सूज जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
डोळ्यांतून सतत पाणी येण्यामागे अॅलर्जी, कोरडेपणाचे लक्षण आहे.
डोळ्यांमधून सतत पाणी येणे ही अनेकांना जाणवणारी सामान्य समस्या आहे. काही वेळा धूळ, धूर, प्रदूषण किंवा थंड वाऱ्यामुळे डोळ्यांतून पाणी येते. मात्र, कोणतेही कारण नसताना वारंवार डोळ्यांतून पाणी येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.डोळ्यांतून अतिरिक्त पाणी येण्याच्या समस्येला एपिफोरा (Epiphora) असे म्हणतात. ही समस्या काही वेळा तात्पुरती असते, तर काही वेळा एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.
डोळ्यांचा कोरडेपणा
डोळ्यांमध्ये पुरेसे अश्रू तयार होत नसतील किंवा तयार झालेले अश्रू लवकर सुकत असतील, तर डोळे कोरडे पडतात. अशा वेळी डोळ्यांच्या पृष्ठभागावर जळजळ आणि चुरचुर निर्माण होते. यावर प्रतिक्रिया म्हणून शरीर अधिक अश्रू तयार करते. त्यामुळे डोळे कोरडे असूनही त्यातून पाणी येऊ शकते.
डोळ्यांची ॲलर्जी
धूळ, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, बुरशी किंवा प्रदूषणामुळे डोळ्यांना अॅलर्जी होऊ शकते. यामुळे डोळ्यांतून पाणी येणे, खाज सुटणे आणि लालसरपणा जाणवू शकतो. डोळ्यांच्या पांढऱ्या भागावर आणि पापण्यांच्या आतील बाजूस असलेल्या पारदर्शक पडद्याला कंजंक्टिव्हा म्हणतात. या पडद्याला संसर्ग किंवा सूज आल्यास कंजंक्टिव्हायटिस म्हणजेच डोळे येण्याचा त्रास होतो. यामध्ये डोळे लाल होणे, पाणी येणे, चिकट स्त्राव येणे आणि पापण्या चिकटणे अशी लक्षणे दिसू शकतात.
पापण्यांच्या कडांना सूज येणे किंवा जळजळ होणे याला ब्लेफरायटिस म्हणतात. यामुळे डोळ्यांना खाज सुटणे, लालसरपणा, जळजळ आणि सतत पाणी येणे अशी लक्षणे दिसू शकतात. डोळ्यांमध्ये धूळ, वाळूचा कण, लहान कीटक किंवा पापणीतील केस गेल्यास डोळ्यांतून अचानक पाणी येऊ लागते.
मोबाइलचा अतिवापर
एसीमध्ये जास्त वेळ राहणे
धूर आणि प्रदूषण
थंड वारा
कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर
काही औषधांचा परिणाम
डोळ्यांना थंड शेक द्या
डोळ्यांना खाज किंवा अॅलर्जीमुळे जळजळ होत असल्यास स्वच्छ थंड पाण्यात भिजवलेले कापड बंद पापण्यांवर काही मिनिटे ठेवा. यामुळे त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
डोळे चोळणे टाळा
डोळ्यांना खाज येत असली तरी हाताने डोळे चोळू नयेत. यामुळे जळजळ वाढू शकते आणि संसर्ग पसरण्याची शक्यता असते. बाहेर जाताना आवश्यकतेनुसार चष्मा वापरा. धूळ, धूर आणि जोरदार वाऱ्याचा थेट संपर्क टाळा.
मोबाइल- लॅपटॉपपासून ब्रेक घ्या
सतत स्क्रीनकडे पाहण्याऐवजी दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी सुमारे २० फूट अंतरावरील वस्तूकडे पाहा.
डोळ्यांची स्वच्छता
डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ ठेवा. डोळ्यांना हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवा. टॉवेल, रुमाल किंवा मेकअपचे साहित्य इतरांसोबत शेअर करू नका.
ॲलर्जी असल्यास योग्य उपचार घ्या
डोळ्यांना खाज, लालसरपणा आणि पाणी येत असल्यास अॅलर्जी असण्याची शक्यता असते. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य अँटी-अॅलर्जिक औषधे किंवा आय ड्रॉप्स वापरावेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.