
अनेक वेळा जीव वाचवण्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली असते ती म्हणजे आजाराची वेळेत ओळख होणं. पण काही आजार असे असतात, जे शांतपणे वाढत जातात आणि निदान होईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अंडाशयातील हाय-ग्रेड सिरियस कार्सिनोमा (HGSC) हा त्यापैकीच एक घातक कॅन्सर असून, तो महिलांमध्ये सर्वाधिक जीवघेण्या प्रकारांपैकी मानला जातो. मात्र आता शास्त्रज्ञांनी त्याच्या मूळ कारणाचा शोध लावला आहे.
अंडाशयाचा कॅन्सर हा महिलांमधील कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. बहुतेक निदान झाल्यानंतर पाच वर्षांपेक्षा जास्त जगणं कठीण होतं. कारण, सुरुवातीच्या टप्प्यात या कॅन्सरची लक्षणं फारशी दिसत नाहीत.
शास्त्रज्ञांना बऱ्याच काळापासून संशय होता की HGSC हा प्रत्यक्षात अंडाशयात नसून, फॅलोपियन ट्यूबमध्ये सुरू होतो. कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील डॉ. अलेक्झांडर निकिटिन यांच्या संशोधनात हे उघड झालं की, फॅलोपियन ट्यूबमधील प्री-सिलिएटेड ट्यूबल एपिथीलियल सेल्स या विशिष्ट प्रकारच्या पेशींमधून या कॅन्सरची सुरुवात होते. या पेशी म्हणजे स्टेम सेल आणि पूर्ण विकसित सिलिएटेड सेल यांच्या मधला टप्पा असतो.
पूर्वी असं मानलं जात होतं की, स्टेम सेल्स या कॅन्सरसाठी जबाबदार असतात. पण या संशोधनात आढळलं की, TP53 आणि RB1 हे दोन महत्त्वाचे कॅन्सरला रोखणारे जीन जेव्हा स्टेम सेल्समध्ये बंद केले गेले, तेव्हा त्या पेशींनी कॅन्सर निर्माण केला नाही. उलट त्या पेशी नष्ट झाल्या. पण जेव्हा हेच जीन प्री-सिलिएटेड सेल्समध्ये बंद केले गेले, तेव्हा कॅन्सर वाढू लागला.
शास्त्रज्ञांनी जीन एडिटिंग तंत्राचा वापर करून उंदरांच्या फॅलोपियन ट्यूबमधील वेगवेगळ्या पेशींमध्ये हे जीन ‘साइलेंस’ केलं. यानंतर निकाल स्पष्ट दिसला की, फक्त प्री-सिलिएटेड सेल्समध्येच कॅन्सर विकसित झाला.
संशोधनात असंही आढळलं की, Krt5 नावाचा जीन प्री-सिलिएटेड पेशींमध्ये विशेषतः एक्टिव्ह असतो. जेव्हा या जीनची उच्च पातळी असलेल्या पेशींमध्ये Trp53 आणि Rb1 बंद केले गेले, तेव्हा उंदरांमध्ये अल्पावधीतच हाय-ग्रेड अंडाशयाचा कॅन्सर विकसित झाला. यावरून स्पष्ट झालं की, ह्याच पेशी कर्करोगाच्या मुळात आहेत.
हा अभ्यास उंदरांवर केला गेला असला तरी मानवी फॅलोपियन ट्यूबची रचना त्यांच्याशी खूप मिळतीजुळती आहे. पुढे मानवी ऊतकांवर संशोधन करून या निष्कर्षांची खात्री करता येऊ शकते. जर हे निष्कर्ष माणसांमध्येही खरे ठरले तर अंडाशयाच्या कॅन्सरविरुद्धच्या लढाईत ही एक मोठी कामगिरी ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.