

शहरात राहिल्याने नोकरी, व्यवसाय आणि प्रगतीची संधी मिळते. पण आजकाल आपण पाहिलं तर शहरातील हवा खूपच प्रदूषित आहे. लाखो लोक रोज ज्या हवेत श्वास घेतात ती आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. लहान मुले, वयोवृद्ध आणि आजारी लोक यांना याचा जास्त त्रास होतो.
भारतामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग (लंग कॅन्सर) हा अजूनही मृत्यूचं मोठं कारण आहे. राष्ट्रीय कर्करोग नोंदणीच्या अंदाजानुसार 2025 मध्ये कॅन्सरची प्रकरणं वाढल्याचं वाढतंय. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा आजार जास्त दिसतो. मात्र आता धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही हा आजार वाढताना दिसतोय. यामध्ये स्त्रिया आणि तरुण लोकांचा समावेश आहे. याचं मुख्य कारण म्हणजे प्रदूषित हवा. जागतिक संशोधनातही हे स्पष्ट झालंय की, हवेतील सूक्ष्म कण (PM2.5) कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.
नवी मुंबईतील ऑन्कोलॉजीस्ट डॉ. पुष्पक चिरमडे यांनी सांगितलं की, "धूम्रपान अजूनही मोठा धोका आहे. पण आता ते एकमेव कारण राहिलेलं नाही. घराबाहेर आणि घरातही प्रदूषित हवेमुळे धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये फुफ्फुसांचा कॅन्सर होतोय. खोकला, धाप लागणं किंवा छातीत दुखणं याकडे दुर्लक्ष करू नये. लवकर निदान झाले तर उपचार चांगले होतात. आज शस्त्रक्रिया, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीसारखे आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. जितक्या लवकर निदान होईल तितकी रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते."
शहरी जीवनातील नेमक्या कोणत्या गोष्टी भारतीयांच्या फुफ्फुसांना धोका निर्माण करत आहेत ते पाहूयात.
शहरातील हवेत नेहमीच गाड्यांचा धूर, बांधकामांमधून उडणारी धूळ, कारखान्यांचा उत्सर्ग आणि कचरा जाळल्यामुळे तयार होणारा धूर मिसळलेला असतो. यातील सर्वात धोकादायक घटक म्हणजे PM2.5. हे अतिशय सूक्ष्म कण असतात. हे कण फुफ्फुसांच्या आत खोलवर जाऊ शकतात. दीर्घकाळ PM2.5 च्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसांमध्ये सूज येते. अशावेळी DNA ला हानी पोहोचते आणि त्यामुळे कॅन्सरच्या पेशी तयार होतात.
अनेकांना वाटतं की, आपण राहत असलेलं घर सुरक्षित आहे. मात्र आपल्या घरातील हवा देखील प्रदूषित असते. लहान अपार्टमेंट्स, कमी वायुविजन असलेली स्वयंपाकघरं, तेलाचा धूर, अगरबत्ती, मस्किटो कॉइल्स, एअरोसोल स्प्रे यामुळे घरातील हवा खराब होते. एलपीजी वापरणाऱ्या घरांमध्येही जर चिमणी किंवा वायुविजन नसेल तर प्रदूषणाचा धोका राहतो.
शहरांमध्ये कामाच्या ठिकाणी काही विशिष्ट धोक्यांचा सामना करावा लागतो. बांधकाम मजूर सिलिकाची धूळ श्वासावाटे घेतात. त्याचप्रमाणे ड्रायव्हर्स सतत डिझेलचा धूर सहन करतात, आणि जुन्या इमारतींमध्ये राहणारे अजूनही एसबेस्टॉसच्या संपर्कात येतात. हे सर्व घटक आधीच प्रदूषित हवेत भर घालतात आणि फुफ्फुसांना दीर्घकाळ इजा पोहोचवतात.
सततचा खोकला, धाप लागणं, छातीत दुखणं किंवा वारंवार श्वसनसंस्थेचा संसर्ग होणं याकडे लोकं दुर्लक्ष करतात. हे प्रदूषणाचे परिणाम किंवा वातावरणातील बदलामुळे झालेला त्रास समजून लोकं दुर्लक्ष करतात. त्यामुळे तपासणी उशिरा होते आणि आजार गंभीर टप्प्यावर पोहोचतो.
अलीकडच्या काळात फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या उपचारांमध्ये खूप प्रगती झाली आहे. आजार कोणत्या टप्प्यावर आहे आणि त्याचे मॉलेक्युलर प्रोफाइल काय आहे यावर उपचार ठरतात. लवकर निदान झाले तर शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढणं, रेडिएशन, टार्गेटेड थेरपी, आणि इम्युनोथेरपी अशा अनेक पर्याय उपलब्ध होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.