
मागील वीस वर्षांपेक्षा जास्त काळात क्रॉनिक मायलॉइट ल्युकेमिया (CML) या रक्ताच्या आजाराबाबत मोठं परिवर्तन घडलं आहे. पूर्वी जीवघेणा ठरणारा हा विकार आता तोंडावाटे घेण्यात येणाऱ्या औषधांच्या मदतीने नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे रुग्णांचं आयुष्य टिकून राहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. मात्र, तरीदेखील सीएमएल हा पूर्णपणे ‘नियंत्रणात राहणारा’ आजार आहे, असं ठामपणे म्हणणं तज्ज्ञांना आता धोकादायक वाटू लागलं आहे.
सध्याच्या उपचारपद्धती केवळ रुग्णाचं आयुष्य वाचवण्यापुरत्या मर्यादित ठरत आहेत, पण त्यापलीकडच्या गरजा पूर्ण करण्यात अपुऱ्या पडत आहेत. विशेषतः तरुण वयोगटातील भारतीय रुग्णांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर आरोग्य, मानसिक आणि सामाजिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. ही कमतरता आता डॉक्टर तसेच रुग्ण या दोघांच्याही लक्षात येऊ लागली आहे.
मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमधल हीमॅटोलॉजी व बीएमटी सर्व्हिसेस विभागाचे संचालक डॉ. शुभप्रकाश सन्याल सांगतात, “सीएमएलवरील उपचार सुरू झाले की पुढचा प्रवास सहज होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. पण प्रत्यक्षात अनेक रुग्णांना अपेक्षित टप्पे गाठताना अडचणींचा सामना करावा लागतो. उपचारांमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम किंवा औषधे न पटल्यामुळे अनेकांना औषधं बदलावी लागतात, तर काही रुग्ण ती घेणंच थांबवतात. खरं तर सुमारे ३० ते ४० टक्के रुग्ण आपल्या सुरुवातीच्या औषधोपचारांवर पाच वर्षांपर्यंत टिकत नाहीत. यावरूनच हे स्पष्ट होतं की एकाच प्रकारचा उपचार सर्व रुग्णांसाठी योग्य ठरत नाही.”
भारतामध्ये सीएमएल हा आजार तुलनेने तरुण वयोगटात अधिक प्रमाणात दिसून येतो. या आजाराचं निदान साधारणपणे ३५ ते ४० वर्षांच्या वयोगटात होतं तर पाश्चात्य देशांत हे वय सरासरी ५० ते ६० वर्षांदरम्यान असतं. आयुष्याच्या या महत्त्वाच्या टप्प्यात बहुतांश लोक आपलं करिअर घडवतात. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतात आणि भविष्याची योजना आखत असतात. त्यामुळे या टप्प्यावर केवळ जिवंत राहणं हेच उपचारांचं ध्येय असू नये, तर त्याचबरोबर ऊर्जा टिकवणं, मानसिक आरोग्य जपणं, कामात उत्पादकता ठेवणं आणि दैनंदिन जीवनातील स्वावलंबन कायम राखणंही तेवढंच आवश्यक ठरतं.
सीएमएलच्या उपचारांमध्ये सुरुवातीला मेजर मॉलेक्युलर रिस्पॉन्स (MMR) मिळवणं हेच मुख्य उद्दिष्ट मानलं जात होतं. मात्र, कालांतराने या दृष्टिकोनात बदल झाला. आता वैद्यकीय तज्ज्ञांचे लक्ष केवळ एमएमआरवर थांबत नाही, तर त्यापेक्षा खोल पातळीवरील प्रतिसाद म्हणजेच डीप मॉलेक्युलर रिस्पॉन्स (DMR) मिळवण्यावर असतं. एकदा डीएमआर गाठल्यावर रुग्णाला ट्रीटमेंट-फ्री रेमिशन (TFR) म्हणजेच औषधे पूर्णपणे थांबवूनही डॉक्टरांच्या देखरेखीखाली रेमिशनमध्ये राहण्याची संधी मिळू शकते.
ही प्रगती विशेषत: नव्याने निदान झालेल्या रुग्णांसाठी महत्त्वाची असते. कारण आजाराच्या पहिल्या दोन वर्षांत डीएमआर साध्य झाल्यास, पुढील काळात टीएफआर मिळवण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. यामुळे रुग्ण दीर्घकाळ औषधोपचाराशिवायही आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो.
अलीकडेच भारतासंदर्भात केलेल्या एका विश्लेषणामधील एका नोंदीनुसार जवळ-जवळ सर्व सीएमएल रुग्ण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कमी तीव्रतेच्या दुष्परिणामाची तक्रार करतात, ज्यापैकी अनेक परिणामांमुळे कामात आणि व्यक्तिगत जीवनात व्यत्यय येतो. मात्र ते हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी पात्र मानले जात नाहीत. परिणामी रुग्णाला एक दीर्घकालीन आजार हाताळतानाच सततची अस्वस्थता व अडथळे सहन करत राहण्याची तारेवरची कसरत करावी लागते
सीएमएलच्या उपचारांमध्ये जसजशी प्रगती होतेय तसतशी केवळ अधिक सखोल मॉलेक्युलर प्रतिसाद देणाऱ्या नव्हे, तर रुग्णांना दीर्घकाळ सहजतेने सहन होणाऱ्या उपचारांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. नवीन औषधोपचार वेगळ्या कार्यप्रणालीने परिणाम देत असून ते जुन्या उपचारांच्या तुलनेत तितकेच प्रभावी – किंबहुना अधिक परिणामकारक ठरतायत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या एका तिसऱ्या टप्प्यातील मोठ्या चाचणीत नव्या थेरपीमधून ९६व्या आठवड्यात ७४.१% रुग्णांनी मेजर मॉलेक्युलर रिस्पॉन्स (MMR) मिळवला, जो जुन्या उपचारांतील ५२% च्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक होता. एवढेच नव्हे, तर दुष्परिणामांमुळे उपचार थांबवण्याचा धोका ५४% कमी झाला. जवळपास अर्ध्या रुग्णांनी MR4 गाठले आणि सुमारे ३०.९% रुग्णांनी सर्वात खोल स्तरावरील प्रतिसाद MR4.5 मिळवला.
भारतामध्ये सीएमएल प्रामुख्याने तरुण वयोगटातील रुग्णांना जास्त प्रमाणात होतो. या रुग्णांना अनेकदा दहा-बारा वर्षे औषधोपचार सुरू ठेवावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी औषधांचा परिणाम जितका महत्त्वाचा आहे, तितकीच औषधे सहजतेने सहन करण्याची क्षमता टिकवून ठेवणेही गरजेचे आहे. हे चैनीचे नव्हे तर आवश्यकतेचे ठरते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.