दिवाळी उत्साहात साजरी झाली की थोड्याच दिवसात वेध लागतात ख्रिसमस आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे. नव्या वर्षी काय काय संकल्प करायचे ते ठरतात, या वर्षी काय केले त्याचा मागोवा आणि काय राहून गेले त्यावर विचारमंथन. एकदा का डिसेंबर महिना सुरु झाला की लगेच सगळ्यांना वाटू लागते, अरेच्या!! हे वर्ष इतक्यात संपले सुद्धा ..?
या सगळ्या भावनांचे, विचारांचे कल्लोळ चालत असतानाच चर्चा सुरु होते ते नव्या वर्षाचे स्वागत कसे करायचे याची आणि त्यासाठी काय काय तयारी करायची त्याची. या तयारीत अनेक कार्यक्रमांचा सहभाग असतो, कोणाला बोलवायचे, खाणे-पिणे, केक कटिंग या सगळ्यांसोबतच एक मोठा विचार असतो भेटवस्तू देण्याचा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या बाबतची सविस्तर माहिती दिली आहे Conceptual Artist मनस्वी पटेल यांनी त्या म्हणाल्या की, हल्ली सगळ्याच गोष्टी म्हणजे, मंगल प्रसंग म्हणा की एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात, वाढदिवस म्हणा की प्रमोशन, या सगळ्यांचे साजरे (Celebrate) होण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणजे पूर्वी पण होत असे हे सगळं पण आता कार्यालयांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये सोबतच घरा-घरात देखील काही ना काही भेटवस्तू देऊन हे दिवस साजरे होतांना दिसतात. आपण जागतिकीकरणाकडे वाटचाल करत आहोत त्याचीच प्रक्रिया आणि फलित म्हणून हल्ली हा बदल मोठ्या प्रमाणात दिसत असावा.
बरं या सगळ्यात एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, 'आपण एकमेकांना भेटवस्तू का देत असू?' वैयक्तिक पातळीवर भेट देणं असो कि व्यावसायिक पातळींवर भेट देणं असो या प्रश्नाचं उत्तर एकच आहे. भेटवस्तू म्हणजे, "आम्ही तुमची या शुभ प्रसंगात आपले म्हणून आठवण काढतो आहोत आणि तुम्हीसुद्धा आम्हाला असेच कायम आठवणीत ठेवा." म्हणजेच नाते निर्माण करण्याचा एक साधा आणि सरळ मार्ग. हा मार्ग भेटवस्तू देण्याने सोपा पण मजबूत होतो.
आता नाते (Relation) निर्माणच करायचे झाले तर ते व्यवस्थितपणे जोडले गेले पाहिजे म्हणून भेटवस्तू देखील तशीच असली पाहिजे, नाही का? मग भेट द्यायची तरी काय? एकालाच द्यायची तर काम जरा सोप्प आहे. त्याची आवड निवड ठाऊक आहे. त्याच्याकडे काय आहे नको ते माहिती आहे. तरीही गोंधळ होतोच म्हणा पण, कॉर्पोरेट गिफ्टिंगच काय? कॉर्पोरेट गिफ्टिंग म्हणजे एकाच वेळी अनेकांना सारखीच भेट देणे. साधारणतः कर्मचारी वर्गाला किंवा आपल्या क्लाएंट्सना भेट देतांना मोठी अडचण निर्माण होते आणि या सगळ्यातून आपण येऊन पोहचतो.
ऑनलाईन शॉपिंग (Shopping) किंवा आपले काही वेंडर्स, जे सतत काहीतरी काम करतात किंवा याप्रसंगी सगळे जमवून आणतात त्यांच्याकडे. शोधत शोधत सगळ्यांना योग्य होईल अशी काहीतरी वस्तू आणण्याच्या नादात आपण गृहोपयोगी किंवा कार्यालयोपयोगी वस्तू आणतो. हे सूत्र अगदी वर्षानुवर्षे असेच चालत राहते. त्यानंतर, "भेटवस्तू नको त्यापेक्षा पाकिटात पैसे दिले असते तरी चालले असते" असा घेणाऱ्याचा आतला आवाज बोलू लागतो. या सगळ्या खटाटोपावर एक युक्ती अशी की आपण भेटवस्तू देण्याची पद्धत बदलू शकतो.
भेटवस्तू हस्तनिर्मित कलाकृती किंवा कलेतून सुंदरता वर्धन करणारी त्याचबरोबर मन उल्हासित करणारी एखादी वस्तू असेल तर? तर देणारा आणि घेणारा यात नक्कीच एक छान नातं निर्माण होईल यात शंकाच नाही. पाण्याची बाटली देण्यापेक्षा एक छोटंसं, मिनी कॅनवास वर सुंदर वाक्य लिहून,हाताने सजवलेलले, टेबल आर्ट दिले तर? जेव्हा केव्हा टेबलसमोर बसून ती व्यक्ती काहीतरी काम करणार, तेव्हा त्या भेटवस्तूकडे त्या व्यक्तीचे लक्ष जाईल, त्यावेळी ते उत्साहवर्धनासोबतच ज्याने ते दिले आहे त्याच्याबद्दल धन्यतेची भावना व्यक्त करेल हे निश्चित.
आपल्या भारत देशाला, कलेचा आणि कलाकारांचा भला मोठा इतिहास आणि वारसा आहे. कला पुढे नेणे म्हणजे फार दिव्य, या कल्पनेमुळेच अनेक कलांचा ह्रास होऊ लागलाय. या काही कला टिकवण्यासाठी आणि कलाकारांना त्यांचा सन्मान मिळवून देण्यासाठी आपण हस्तनिर्मित वस्तू अथवा कलाकृती जर भेटवस्तू म्हणून देऊ लागलोत तर या सांस्कृतिक वारसाला आणि त्याच्या वारासदारांना आपण वाचवू शकतो.
अजूनही कला क्षेत्रात जाऊ पाहणारे अपत्य जोपर्यंत कलेसोबत नोकरी करत नाही तोपर्यंत पालकांना त्याच्या कलेवर आणि कलेच्या प्रभावावर शाश्वती निर्माण होत नाही. अशावेळी हस्तनिर्मित वस्तूंना भेटवस्तू म्हणून देण्याचा सगळे विचार करू लागले तर अशा समजुती बदलायला फार वेळ लागणार नाही. छोटे छोटे आणि सुंदर कलात्मक वस्तू निर्माण करणारे अनेक हात आपल्याच आजूबाजूला आहेत. आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहचता आले पाहिजे. "कलाकृती महाग असते, हा गैरसमज आहे, आणि असली तरी ती हस्तनिर्मित आहे. कोणा एका व्यक्तीची ती कल्पना आहे, प्रतिभा आहे, त्याचबरोबर तासनतास एकाग्रतेने केलेली मेहनत आहे हे समजून घेता आले पाहिजे”.
या सगळ्यात एक संधी सुद्धा दडली आहे. ती म्हणजे आपल्या या कलेला आणि कलाकारांना जागतिकीकरणात एक स्थान मिळवून देणे. ते या प्रक्रियेने शक्य होऊ शकते. यापुढे जाऊन जर आपण वेळ काढून एकदा सध्या मोठ्या प्रमाणात बनत असलेल्या हस्तनिर्मित वस्तूंकडे पाहिले तर लक्षात येईल की जुन्या कलांचा वारसा पुढे नेत असतांनाच, आजच्या अस्थवस्थ झालेल्या पर्यावरणाला ठीक करता येईल अशा वस्तू बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. ही काळाची गरज आहे.
आता हेच बघा ना, हस्तनिर्मित योग्य मापात शिवलेल्या जुट, कॅनवास बॅग्स ज्या प्लास्टिक मुक्ती आंदोलनात ठामपणे उभ्या आहेत, छोटे छोटे क्ले (माती) पासून बनलेले प्लांटर्स. ज्यात सावलीत किंवा घरात वाढणारे (इंडोर प्लांट्स), टेबलवर ठेवता येणारे, ऑक्सिजन देणारे छोटे रोप लावले तर, तुमचा दिवस उत्साहाने आणि स्वास्थ्याने भरून निघेल. अश्या एक ना अनेक गोष्टी आहेत. फक्त आपल्याला आपला विचार बदलण्याची त्याला व्यापक बनवण्याची आवश्यकता आहे. “हस्तनिर्मित वस्तू विकत घेतांना केवळ कोणाला मदत केल्याचे, कलाकाराची कला पुढे नेण्याचे समाधान देत नाहीत तर त्याच्या अस्तित्वातच मानवीय स्पर्श असल्याने माणसाशी माणूस जोडण्याचे एक महत्वाचे कामही करते”. चला तर मग येणाऱ्या नवीन वर्षात आपण सगळ्याच गोड प्रसंगांना हस्तनिर्मित भेटवस्तू देऊन माणुसकीची साखळी आणखीन मजबूत करूया.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.