मयुरेश कडव, साम टीव्ही प्रतिनिधी
उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतो. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केला, मेसेजची पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा
झोप ही अशी गोष्ट आहे जिच्याशिवाय आपलं जगणं मुश्किल होईल. आपण दिवसभर कितीही काम केलं तरी शरीराला किमान 7 तासांची झोप हवीच. पुरेशी झोप घेतल्यानं शरीर आणि मन ताजंतवानं राहतं. मात्र अलिकडच्या काळात आपली जीवनशैली इतकी बदललीय की, सुखाची झोप हा शब्द आता कागदावरच राहिलाय. धकाधकीचं जीवन आणि रात्री अपरात्री मोबाईल पाहण्याच्या सवयीमुळे झोपेचा पॅटर्न बदललाय. मात्र हाच पॅटर्न तुमच्या जिवावरही उठू शकतो. वेळी-अवेळी झोपण्यमुळे तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय म्हंटलंय ते आधी आपण पाहूयात....
तुम्ही चुकीच्या वेळी झोपत असाल तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. यासंदर्भात पेन्सिल्विनिया स्टेट युनिव्हर्सिटीनं एक संशोधन केलंय. त्यात 50 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना अनिद्रा विकार जडल्याचं म्हंटलंय. हे लोक वेळी-अवेळी कधीही झोप घेतात, त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढत असल्याचं संशोधनात म्हंटलंय. झोपेच्या बदलत्या सवयींमुळे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आलाय.
हा मेसेज झोप आणि आपल्या आरोग्याशी संबंधित असल्यानं याची खातरजमा होणं आवश्यक आहे. साम टीव्हीच्या प्रतिनिधींनी तज्ज्ञांना हा मेसेज दाखवला. झोपेचा पॅटर्न बदलला तर नेमकं काय होऊ शकतं हे त्यांच्याकडून जाणून घेतलं. आमच्या रिसर्च टीमनं व्हायरल मेसेजची आणखी खोलवर तपासणी केली. झोपेसंदर्भात इंटरनेटवर उपलब्ध असलेलं संशोधन तपासून पाहिलं. तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप अत्यंत आवश्यक आहे. याचसंदर्भात पेन्सिल्विनिया स्टेट युनिव्हर्सिटीनं संशोधन केलं असून एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या संशोधनानुसार जगातील 50 टक्क्याहून अधिक लोक अर्धवट झोप घेतात. अनेकजण टप्या-टप्प्यात झोप पूर्ण करतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका आहे. याला बदलती जीवनशैली कारणीभूत आहे. कमी झोप घेणं म्हणजे आपलं आयुष्य कमी करण्यासारखं आहे. जे लोक पुरेशी झोप घेतात ते इतरांपेक्षा 20 ते 25 वर्ष जास्त जगू शकतात.
कामाचे वाढलेले तास, कामाचं बदललेलं स्वरूप, मोबाईल-लॅपटॉपचा वाढता वापर, मद्यपान धुम्रपान, कौटुंबिक वाद, चिंता अशा अनेक कारणांमुळे झोपेचं घड्याळ बिघडलंय. तज्ज्ञांच्या मते पुरेशी झोप न घेतल्यास शरीराला आवश्यक असलेल्या मेलाटॉनिनची निर्मिती होत नाही. हार्मोन्सची वाढ होत नाही. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळतं.
ज्या लोकांना पहाटे 2 ते 7 आणि दुपारी 2 ते 5 या वेळेतच झोप येते अशा लोकांसाठी झोपेचा हा पॅटर्न अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत चुकीच्या वेळी झोपण्याच्या सवयीमुळे हार्ट अटॅकचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 तास झोप घ्या..वेळी-अवेळी झोपणं टाळा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.