

एकदा का थंडीला सुरुवात झाली की, लोक जास्त चटपटीत खाणं पसंत करतात. काहींना गरमा गरम पदार्थ या दिवसात खायला प्रचंड आवडतात. पण अनेकांना रोजच्या धावपळीमुळे काही आवडीचे पदार्थ घरी बनवायला वेळ मिळत नाही. याचाच विचार करुन तुम्ही आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट सोपी कुरकुरीत, चटपटीत रेसिपी आणली आहे. चला जाणून घेऊयात याची रेसिपी.
आलू मेथीचे भजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ ते ३ मध्यम आकाराचे बटाटे सोलून स्वच्छ धुवून किसून घ्यावेत. किसलेले बटाटे हलके दाबून त्यातलं जास्तीचं पाणी काढून घ्या. त्याने भजी नरम होणार नाहीत. त्यानंतर मेथीची पानं दोन ते तीन वेळा पाणी बदलून स्वच्छ धुवा. मग बारीक चिरून घ्या.
आता एका मोठ्या भांड्यात बेसन आणि त्यात मॅश केलेले बटाटे मिक्स करा. मग चिरलेली मेथी, चिरलेला कांदा, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे पावडर, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य एकत्र नीट मिसळून घ्या. सुरुवातीला पाणी अजिबात किंवा फार कमी घाला, कारण बटाटा आणि कांद्यामधूनही बेसनाला पाणी सुटतं. मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून घट्टसर भजी सारखं पीठ मळून घ्या.
यानंतर कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल जास्त जास्त तापवू नका. नाहीतर भजी बाहेरून पटकन रंग बदलतील आणि आतून कच्चे राहतील. तेल हलकं तापलं की, हाताने किंवा चमच्याने थोडं थोडं मिश्रण घेऊन तेलात सोडा. एकावेळी ४ ते ५ भजीच तळा, त्याने तेलाचं तापमान संतुलित राहतं. भजी हळूहळू उलटसुलट करत सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
भजी नीट कुरकुरीत झाले की, ते कढईतून काढून टिश्यू पेपरवर ठेवा. त्याने जास्त तेल निघून जाईल. अशा प्रकारे सर्व भजी तयार करून घ्या. मग गरमागरम आलू मेथीचे भजी चहा, हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. ही रेसिपी बनवायला सोपी आणि कमी वेळेत होणारी आहे. २० ते ३० मिनिटात तुम्ही ही रेसिपी तयार करून इतरांचं मन जिंकू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.