
नवजात बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अपुरी असते.
ओठांवरील चुंबन हर्पिस संसर्गाला कारणीभूत ठरू शकते.
हर्पिस विषाणू बाळांमध्ये गंभीर आजार निर्माण करतो.
लहान बाळ म्हटलं की आपण प्रेमाने त्याचं चुंबन घेतो. परंतु हे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहे हे तुम्हाला माहितीये का? मोठ्या मुलांच्या किंवा प्रौढांच्या तुलनेत नवजात बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अपूर्ण असते. त्यामुळे अगदी किरकोळ जंतुसंसर्ग देखील त्यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतो.
चेहऱ्यावर किंवा ओठांवर घेतलेलं चुंबनसुद्धा थेट बॅक्टेरियाचा प्रसार करून बाळाच्या शरीरात गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकते.
नवजात बाळांचा जन्म पुरेशा रोगप्रतिकारक शक्तीसह होत नाही. प्रौढांप्रमाणे त्यांच्या शरीरात रोगांशी लढण्याची क्षमता अजून विकसित झालेली नसते. त्यामुळे प्रौढांना हानी न पोहोचवणारे बॅक्टेरिया बाळांसाठी धोकादायक ठरू शकतात.
ब्रिटनमधील NHS (नॅशनल हेल्थ सर्व्हिस) यांच्या सांगण्यानुसार, कोल्डसोर (ओठांवरील जखमा) असलेला एखादा व्यक्ती बाळाला चुंबन घेतल्यास हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस सहज पसरू शकतो. हा आजार नवजात बाळांमध्ये अत्यंत गंभीर ठरतो.
जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांत बाळाचं शरीर नैसर्गिक संरक्षण तयार करत असतं. या काळात अगदी किरकोळ संसर्ग देखील बाळाच्या शरीराला जड जातो. यावेळी काही तासांतच गंभीर स्वरूप धारण करू शकतो. न्यूमोनिया, सेप्सिससारखे आजार बाळांमध्ये झपाट्याने बळावतात. म्हणूनच तज्ज्ञ नेहमीच नवजात बाळांना हाताळताना किंवा त्यांच्यावर प्रेम व्यक्त करताना अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला देतात.
नवजातांसाठी सर्वात मोठा धोका म्हणजे हर्पिस सिम्प्लेक्स विषाणू. प्रौढांमध्ये हा विषाणू बहुधा फक्त कोल्डसोर निर्माण करतो जे किरकोळ वाटतात. परंतु बाळांमध्ये हा विषाणू डोळे, तोंड किंवा त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करून रक्ताभिसरण आणि अवयवांपर्यंत पसरू शकतो. यामुळे अवयव निकामी होणं, गंभीर संसर्ग किंवा मृत्यूही ओढवू शकतो. जन्मानंतरच्या पहिल्या चार आठवडे हा धोका सर्वाधिक असतो.
ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (GBS) हा जंतू प्रौढांमध्ये निरुपद्रवी असतो, पण बाळांमध्ये तो सेप्सिस किंवा मेंदुज्वर निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे ई.कोलाई हा प्रौढांमध्ये किरकोळ त्रास देणारा बॅक्टेरिया बाळांमध्ये अतिशय गंभीर आजार निर्माण करतो.
या सर्व बॅक्टेरियाचा धोका एवढा मोठा यासाठी असतो की, नवजात बाळांची रोगप्रतिकारक शक्ती अजून अपुरी असते आणि ते प्रौढांप्रमाणे प्रतिकार करू शकत नाहीत. साध्या चुंबनातून आलेले जंतू देखील त्यांच्या जीवावर बेतू शकतात.
पालकांना आणि नातेवाईकांना बाळाला जवळ घेऊन, कुशीत घेऊन किंवा चुंबन घेऊन आपुलकी दाखवावीशी वाटते. मात्र हे करताना काही सोपे पण महत्वाचे सुरक्षित पर्याय अवलंबणे आवश्यक आहे.
बाळाला हात लावण्यापूर्वी व्यवस्थित हात धुणं ही सर्वात साधी पण प्रभावी पद्धत आहे. यामुळे हातांवरील धोकादायक बॅक्टेरियाचा प्रसार टाळता येतो.
बाळाच्या चेहऱ्यावर, ओठांवर किंवा हातांवर चुंबन घेणं टाळावं. कारण या भागांतून संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्याऐवजी बाळाच्या डोक्याच्या मागील भागावर किंवा पायांवर प्रेमाने चुंबन घ्या
सर्दी, ताप, खोकला, कोल्डसोर किंवा इतर कोणताही त्रास असलेल्या व्यक्तींनी बाळाजवळ जाणे किंवा त्याला स्पर्श करणं टाळावं. प्रौढांना किरकोळ वाटणारी लक्षणं देखील बाळासाठी प्राणघातक ठरू शकतात.
पालकांनीही ठामपणे नातेवाईकांना किंवा मित्रांना सांगणे आवश्यक आहे की बाळाला चुंबन घेऊ नये.
शारीरिक स्पर्शाशिवायही बाळावर प्रेम व्यक्त करता येते. हलकेपणे कुरवाळणे, गोड आवाजात बोलणे किंवा बाळाला कुशीत घेऊन शांतपणे बसणे यामुळेही बाळाला सुरक्षिततेची व प्रेमाची जाणीव होते.
नवजात बाळांना चुंबन घेणे का धोकादायक आहे?
त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अपुरी असल्यामुळे संसर्गाचा धोका असतो.
ओठांवरील चुंबनामुळे कोणता विषाणू पसरू शकतो?
हर्पिस सिम्प्लेक्स विषाणू पसरू शकतो.
जन्मानंतर कोणत्या काळात संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो?
पहिल्या चार आठवड्यांत संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.
GBS जंतूमुळे बाळांमध्ये कोणते आजार होऊ शकतात?
सेप्सिस किंवा मेंदुज्वर होऊ शकतो.
बाळावर प्रेम व्यक्त करण्याचा सुरक्षित मार्ग कोणता?
डोक्याच्या मागे किंवा पायांवर चुंबन घेणे सुरक्षित आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.