Yere Yere Paisa 3 Team: येरे येरे पैसा" आणि "येरे येरे पैसा 2" या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादानंतर तिसरा सिक्वल म्हणजे "येरे येरे पैसा 3" उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.. चित्रपटाच्या टीमने आज शिर्डीत साई दरबारी हजेरी लावत आशिर्वाद घेतले.. दिग्दर्शक संजय जाधव, निर्माता अमेय खोपकर, तसेच कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित यांच्यासह इतर कलाकार आणि टीम सदस्य उपस्थित होते.. चित्रपटाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळो असं साकडं साईबाबांना घातलं आल्याचं निर्माता अमेय खोपकर यांनी म्हंटलय..
प्रेक्षकांनी चित्रपट गृहात जाऊन मराठी चित्रपट बघितले पाहिजे.. उत्तम दर्जाचे मराठी चित्रपट दिले तर महाराष्ट्रातील प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन बघतात. राज्यसरकार मराठी चित्रपटांना अनुदान देतंय, पण अनुदान मिळते म्हणून चित्रपट करावा असे नाही. येत्या काळात राज्य सरकार मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी काही करेल अशी अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया अमेय खोपकर यांनी दिलीये.
अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणाला की, येरे येरे पैसा 3 हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाची उत्तम पर्वणी आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी साईबाबांचे दर्शन घेऊन खूप छान वाटतंय.. जसे शेती आणि पाण्यासाठी पाऊस खूप गरजेचा आहे तसे माणसाच्या आयुष्यात मनोरंजन देखील खूप गरजेचे आहे.. त्याचप्रमाणे मनोरंजनातून येणारा पैसा दिग्दर्शक आणि आमच्यासाठी खूप गरजेचा आहे असे मिश्किल भाष्य सिद्धार्थ जाधव याने केले.
यावर्षी प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाना चांगले दिवस दाखवलेत.. मराठी चित्रपट थिएटरमध्ये गर्दी खेचताय. आम्ही आज केवळ "येरे येरे पैसा"साठी नाही तर संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीसाठी साईबाबांकडे साकडं घालायला आलो होतो. इतरांच्या तुलनेत मराठी चित्रपट कुठेही कमी पडत नाहीत. अमेय खोपकर यांच्यासारखे मोठे निर्माते मराठी चित्रपट सृष्टीसाठी काहीतरी चांगलं करू पाहताय. लवकरच मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ परत येईल अशी अपेक्षा आहे अशी भावना अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने व्यक्त केली आहे. दरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने "येरे येरे पैसा 3" च्या टीमचा सत्कार करण्यात आला. हा चित्रपट विनोदी मनोरंजनाने भरलेला असल्याने सर्वांनी नजिकच्या चित्रपट गृहात जाऊन नक्की चित्रपट बघावा अशी अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली आहे.