Asha Bhosle: सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि त्यांचा मुलगा आनंद भोसले यांनी पुण्यातील मॅगरपट्टा परिसरात असलेला एक आलिशान फ्लॅट ६.१५ कोटी रुपयांना विकला आहे. 'पंचशील वन नॉर्थ' या प्रोजेक्टमधील हा फ्लॅट १९व्या मजल्यावर असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ ३,४०१ चौरस फूट आहे. विशेष म्हणजे या फ्लॅटमध्ये १८२ चौरस फूटाचा खास टेरेस आणि पाच पार्किंग स्पॉट्सचा समावेश आहे.
हा फ्लॅट भोसले कुटुंबाने २०१३ साली सुमारे ४.३३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. सुमारे १२ वर्षांनंतर त्यांनी तो ६.१५ कोटींना विकला असून, त्यातून त्यांना अंदाजे ४२ टक्के परतावा मिळाला आहे. हा व्यवहार १४ जुलै २०२५ रोजी नोंदवण्यात आला असून, त्यासाठी ४३ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांचे नोंदणी शुल्क भरले गेले आहे.
इमारतीचे स्थानिक वैशिष्ट्य
‘पंचशील वन नॉर्थ’ ही इमारत पंचशील रिअॅल्टी या कंपनीने बांधलेली आहे. ही इमारत पुणे विमानतळापासून 9 किमी, खराडीतून 6 किमी, हिंजवडी (IT हब) पासून 25 किमी अंतरावर आहे. या व्यवहाराबाबत आशा भोसले किंवा खरेदीदारांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.