Daya Dongre Passes Away: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुमुखी अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
१९४० साली जन्मलेल्या डोंगरे यांना अभिनयाची गोडी शालेय जीवनातच लागली होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची सुरुवात केली आणि पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचं शिक्षण घेतलं. त्यांच्या आई यमुताई मोडक या नाट्यअभिनेत्री, आत्या शांता मोडक या गायिका आणि पणजोबा कीर्तनकार असल्याने कलेचा वारसा दया डोंगरे यांना पिढीजात लाभला होता. लग्नानंतरही पती शरद डोंगरे यांच्या पाठिंब्याने त्यांनी कलाक्षेत्रात काम सुरू ठेवलं.
दूरदर्शनवरील ‘गजरा’ मालिकेमुळे दया डोंगरे त्या प्रसिद्धी झोतात आल्या. यानंतर त्यांनी ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची’, ‘चार दिवस सासूचे’, ‘कुलदीपक’ अशा मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये खाष्ट सासूची भूमिक करत नकारात्मक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘तुझी माझी जमली जोडी रे, नांदा सौख्य भरे, लेकुरे उदंड झाली, आव्हान, स्वामी’ अशा मालिकांमध्ये आणि नाटकांतही त्यांनी काम केलं.
त्यांच्या खाष्ट पण मजेशीर सासूच्या भूमिका इतक्या प्रभावी ठरल्या की त्यांची तुलना हिंदी सिनेमातील ललिता पवार यांच्याशी होऊ लागली. १९९० च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला, पण त्यांच्या भूमिकांचा ठसा आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.