V. Shantaram Biopic: भारतीय चित्रपटाला नवी सौंदर्यभाषा, नवे कथन, नवी तांत्रिक दृष्टी आणि अद्वितीय प्रयोगशीलता देणारे महान दिग्दर्शक शांताराम राजाराम वणकुद्रे, म्हणजेच व्ही. शांताराम, यांचे विलक्षण आणि प्रेरणादायी जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य आणि ऐतिहासिक मेगा बायोपिकच्या माध्यमातून उलगडणार आहे. स्टुडिओमधील सामान्य कामगारापासून जागतिक ख्यातीचे कलावंत आणि प्रयोगशील दिग्दर्शक होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे समर्पण, सर्जनशीलता आणि कलासाठी घेतलेली झुंज यांचा विलक्षण संगम आहे.
‘झनक झनक पायल बाजे’च्या नृत्यवैभवापासून ‘दो आंखें बारह हाथ’च्या सामाजिक संदेशापर्यंत, ‘अमृतमंथन’च्या तांत्रिक क्रांतीपासून ‘नागरिक’च्या सामाजिक वास्तवदर्शी कथानकापर्यंत व्ही. शांताराम यांच्या प्रत्येक कलाकृतीने भारतीय सिनेमाला नवा आयाम दिला. त्यांचे जीवन म्हणजे वास्तव आणि कलात्मकता यांचे अद्वितीय दर्शन.
याच वैभवशाली प्रवासावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या मेगा बायोपिकचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर त्याने तुफान धुमाकूळ घातला आहे. पोस्टरमधील भव्यता, रंगसंगती आणि सिनेमॅटिक लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून त्याच्या कारकिर्दीतील ही भूमिका ‘गेमचेंजर’ ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ सारख्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. विशाल दृश्यरचना, कलात्मक तपशील आणि कथानकाची खोली यामुळे हा चित्रपट एक सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे, असे ते सांगतात. ‘‘व्ही. शांताराम हे नाव घेतले की भारतीय चित्रपटसृष्टीची संपूर्ण परंपरा नजरेसमोर उभी राहते. त्यांच्या संघर्षाचा आणि प्रयोगशीलतेचा पडद्यावर पुनर्जन्म देताना एक वेगळी ऊर्जा जाणवली,’’ असे ते म्हणाले.
राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत हा भव्यदिव्य सिनेमा येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मेगा बायोपिकमुळे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील एक सुवर्णपान पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.