मराठी टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. 'ठरलं तर मग' मालिकेच्या टीममधील कलाकार गौरव काशिदे यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री जुई गडकरी हिने फेसबुक पोस्ट लिहित त्याचा अपघात झाल्याची माहिती दिली होती. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण उपचारा दरम्यानच गौरवची रविवारी सकाळी प्राणज्योत मालवली आहे. त्याच्या निधनाने मालिकेतील कलाकारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
९ जूनला संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना वांद्रा येथे गौरवचा अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसला होता. यामुळे तो कोमात होता. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण उपचाराअंती त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निधनाबद्दलचे वृत्त अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावरून दिलेले आहे. गौरवच्या निधनानंतर जुईने भावुक फेसबुक पोस्ट शेअर केलेली आहे..
शेअर केलेल्या पोस्टमध्ये जुई गडकरी म्हणते, “ “ताई मला कोणी उठवलंच नाही, म्हणुन लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळुहळु... सिनचे क्यून देताना जर ते कॅरेक्टर पळत आलेले असेल तर तो पळुन पण दाखवायचा. हुशार होता, मला रोजचे सीन एक्सप्लेन करायचा. हसतमुख होता, मेहनती होता, त्या वयात मुलं असतात तसा अल्हड पण होता… मला थोडा घाबरायचा म्हणून “ताईसमोर स्मोक करुन गेलं की ताई लगेच ओळखते आणि ओरडते. त्यापेक्षा नाही करत स्मोक” असं म्हणून निदान तेवढ्यापुरतं तरी टाळायचा… गुणी मुलगा होता...”
“रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका female AD ला आणि हेयर ड्रेसरला घरी सोडुन जायचा. त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला. त्या दिवशी नेमकी आमची हेयर ड्रेसर चारकोपलाच उतरली. नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिमपर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं म्हणून गाडी सांभाळून चालवायचा. त्याचा २४ वा वाढदिवस होता १०जूनला आणि ९तारखेला त्याच्या बाईकचा बांद्रामध्ये भीषण अपघात झाला. त्याच्या मेंदुला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता... पण सगळ्यांशी त्यानी छान नातं जोडलं होतं... ”
“गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजूनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गौरव परत येईल. गौरव, काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे... तु लेट आला असतास… पण आला तरी असतास... तुझ्या आतम्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं? त्या आई बाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करुशकत नाही. देव त्यांना बळ देओ... गौरव काशिदे तुझी आठवण येतेय.... ”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.