Tharala Tar Mag: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'मध्ये 18 जुलैच्या भागात भावनिक आणि थरारक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. सायलीच्या डोहाळ्यांमुळे अर्जुनची सुरू झालेली धावपळ, प्रियाचा तुरुंगातून बाहेर पडण्यासाठीचा नवा डाव आणि सायलीवर आलेलं संकट यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे.
एपिसोडच्या सुरुवातीला सायली रात्री उशिरापर्यंत खोलीत अस्वस्थपणे फिरत असते. अर्जुन जागा झाल्यानंतर तिची विचारपूस करतो. तेव्हा सायलीला मोतीचूरचे लाडू खाण्याची इच्छा असल्याचे ती सांगते. अर्जुन लगेच ऑनलाइन ऑर्डर करण्याचा प्रयत्न करतो. मात्र मध्यरात्र झाल्यामुळे सर्व दुकानं बंद असतात आणि कोणतीही डिलिव्हरी उपलब्ध नसते. त्यामुळे सायली निराश होते. पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुन एका मित्रालाही फोन करतो. मात्र त्यालाही तातडीने लाडू बनवून देणे शक्य नसल्याने अखेर अर्जुन स्वतः पनवेलमधील अनेक दुकानांमध्ये मोतीचूरचे लाडू शोधत फिरतो. पण त्यालाही लाडू मिळत नाही.
दरम्यान, सायली कुसुमताईंना फोन करते. कुसुमताई आश्रमातील श्वेताचे भरभरून कौतुक करतात. श्वेता अगदी सायलीसारखीच सर्वांना आपलेसे करत असल्याचे त्या सांगतात. मात्र श्वेताच्या चांगुलपणा मागील सत्य त्यांना अद्याप माहीत नसते. दुसरीकडे, तुरुंगात असलेली प्रिया बाहेर पडण्यासाठी नवा डाव आखते. ती एका महिला पोलिसाच्या मदतीने सचिनला फोन करून आवश्यक वस्तूची व्यवस्था करण्यास सांगते.
सायलीकडे परतल्यानंतर अर्जुन रिकाम्या हाताने न येता मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन येतो. त्यानंतर तो स्वतः स्वयंपाकघरात लाडू तयार करतो. अर्जुनचे हे प्रेम पाहून सायली भारावून जाते. लाडू खाल्ल्यानंतर ती त्यांचे मनापासून कौतुक करते. अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि त्याचा उत्साह पाहून घरातील सर्वजण जागे होतात.
मात्र या आनंदाला लगेचच गालबोट लागते. किचन आवरताना कल्पनाच्या लक्षात येते की अर्जुनने वापरलेले बेसन एक्सपायर झालेले आहे. ती घाईघाईने अर्जुनला ही गोष्ट सांगण्यासाठी धाव घेते. त्याचवेळी सायलीला अचानक उलट्या सुरू होतात. हे पाहून अर्जुन हादरून जातो. आपल्या निष्काळजीपणामुळे सायली आणि बाळाला काही धोका तर होणार नाही ना, अशी भीती त्याच्या मनात निर्माण होते. आता सायलीची तब्येत कशी राहणार आणि प्रियाचा पुढचा डाव काय असणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.