गणेशोत्सवाचा सण राज्यासह देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेश उत्सव अनेक कुटुंबीय आपल्या घरी मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करतात. अनेक ठिकाणी आपल्याला सामाजिक बांधिलकी दिसून येते. अशातच किरण मानेंनी नुकतंच सोशल मीडियावर समाजामध्ये ऐक्याची भावना निर्माण करणारी एक पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नुकतंच शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने एका मुस्लिम कुटुंबीयाची कहाणी सांगितली आहे. नुकतंच त्यांनी आपल्या घरी गणपती बाप्पा बसवला आहे. अभिनेत्याने पोस्ट करत त्या कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “जनाब समीर हुसेन संदे या मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाचा फोटो बघून लै लै लै भारी वाटलं भावांनो! समीरभाई माझे फॅन असल्याचा अभिमान वाटला. कारण हे हायेत आपले खरे संस्कार... आन् हीच हाय आपल्या संविधानातली ‘बंधुता’ ! रेठरे बुद्रूक गावातल्या आमचा समीरभाई म्हणजे कवीमनाचा संवेदनशील माणूस. ज्या भक्तीभावानं तो अल्लाहची इबादत करतो, तेवढीच अदब तो गणपतीची पूजा करतानाबी ठेवतो. रमजानमध्ये रोजा ठेवण्यासोबतच नवरात्रीत उपास करणं हा बी आपला ‘फर्ज’ मानतो. अशा नादखुळा माणसाचा ‘जमीर’ किती निर्मळ, नितळ असंल गड्याहो !” (Actors)
पुढे आपल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “ही अख्खी फॅमिलीच लै लै लै जबराट हाय. समीरभाईचे वडील पै. हुसेनभाई यांच्या जोपर्यंत जीवात जीव होता, पाय साथ देत होते तोपर्यंत किल्ले मच्छिंद्रगडवरची मच्छिंद्रनाथाची दर रविवारची पहाटेची आरती त्यांनी कधी चुकवली नाय! मला राहून-राहून वाटतं रेठरे बुद्रुक गावाला ‘मानवता जपनारं लोभस गांव’ म्हणून पुरस्कारच देऊन टाकावा. अहो, खरंच या गावाचे एकेक किस्से म्हणजे द्वेषाचं विष पसरवू पहाणाऱ्यांना सन्नकन् कानाखाली हानल्यागत हाय.” (Ganeshotsav)
पुढे आपल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “रेठऱ्याच्या जोतिबाची पालखी दरवर्षी दसऱ्याच्या जागराला निघते. या पालखीचा मान आजबी मुस्लिम समाजाला हाय ! रेठऱ्यात रहिमतबुवा आन् पीर साहब यांच्या दोन छोट्या दर्गा हायेत. तिथं हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेनं चादर चढवताना आन् दुवा मागताना दिसतात. याच रेठर्यातले गनीभाई, ज्यांना ‘प्यारन भाभीचा गनी’ म्हनायचे, ते एकतारी भजनातले ‘नुसरत फ़तेह अली खान’ होते. अशा खनखनीत आवाजात पांडुरंगाला साद घालायचे की साक्षात विठूराया भजनात येवून नाचून जात आसंल ! ” (Entertainment News)
पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने म्हणाले, “त्यांचेच जिगरी दोस्त, रेठर्याचेच रामभाऊ सातपुते दरवर्षी न चुकता रमजानच्या महिन्यात रोजे धरत. रेठाऱ्यात मानाचे तीन गणपती असतात. त्या गणपतींचा आगमन व पालखीचा मान ‘नाभिक’ समाजाला देण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली हाय. अजून काय सांगू? आज मानसामानसात फूट पाडू पहाणार्या काळात, प्रेमाचा संदेश देणारं रेठरे बुद्रुक हे गाव महाराष्ट्रात आदर्श ठरावं असं हाय. रेठर्याच्या मातीतल्या माझ्या बांधवांना कळलंय, कृष्णामाईचं पानीबी तहान भागवताना कधी भेदभाव करत नाय. आन् चौकातलं वडाचं झाडबी सावली देताना जातधर्म बघून देत नाय. भेदाभेद आन् द्वेष हे रिकाम्या टाळक्यांनी उकरून काढलेले धंदे हायेत. म्हनूनच अकबर इलाहाबादी म्हणायचा, “मज़हबी बहस मैंने की ही नहीं ‘फ़ालतू अक़्ल’ मुझ में थी ही नहीं !” ” (Serial)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.