'कलर्स मराठी'वरील 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यंदाचं सीझन प्रेक्षकांसाठी खास ठरलं आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनपासून होस्ट तर बदलला आहेच पण बिग बॉसच्या घरातील अनेक नियम आणि अटीही बदलले आहेत. गेल्या चार सीझनचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले होते. आता पाचव्या सीझनचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करीत आहे. सध्या रितेश देशमुखच्या होस्टिंगची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
फक्त चाहत्यांकडूनच नाही तर, सेलिब्रिटींकडूनही रितेश देशमुखचे कौतुक केले जात आहे. नुकताच बिग बॉस मराठी फेम किरण मानेनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेता रितेश देशमुखचे कौतुक केले आहे. पोस्ट शेअर करत किरण मानेने होस्ट रितेश देशमुखचे कौतुक करत लिहिले की, "रितेश! हॅटस् ऑफ भावा.... कुणाविषयी कुठलाही पुर्वग्रह डोक्यात न ठेवता अत्यंत बॅलन्स पद्धतीनं बिगबॉस होस्ट करतो आहेस. मराठीला पहिल्यांदा 'बिगबॉस' हा खेळ उमजलेला होस्ट लाभला आहे. आक्रस्ताळेपणा नाही, पर्सनल आवडीनिवडीवरुन कुणावर उगाचंच चिखलफेक नाही."
"केवळ 'स्वत:ला आवडतात म्हणून' न खेळणार्या निष्क्रिय लोकांना डोक्यावर घेणे नाही. सगळं जिथल्या तिथं. जसं आहे तसं आरशासारखा. लख्खं मुळात तू स्वत: 'माणूस' म्हणून नितळ आहेस. तो नितळपणा तुझ्या सूत्रसंचालनात उतरला आहे. बिग बॉस हा खेळ सायकॉलॉजिकल आहे. विपरीत परिस्थिती निर्माण करून माणसाचं 'व्यक्तिमत्व' पारखण्याचा आहे, याची जाणीव सतत तुला असते, ही तुझी 'युनिक' क्वॉलिटी आहे."
"बिग बॉस हे असं 'रामायण' आहे, ज्यात एकाच माणसात असलेली राम-रावण-सीता-कैकेयी-लक्ष्मण-बिभिषण-भरत-दशरथापासून हनुमानापर्यंत सगळी व्यक्तीमत्त्वं बाहेर पडतात. कधी कुणातली कैकेयी भारी ठरते, तर कधी कुणी बिभिषण ठरतो. माणूसपणाची कसोटी पहाणारा अद्भूत डाव सुरू होतो. यावेळी यांना खेळवणारा, झुलवणारा, चकवणारा, झुंजवणारा आणि फुलवणारा जादूगार फार महत्त्वाचा असतो... रितेश देशमुखच्या रूपानं यावेळी सीझन पचला असा भन्नाट 'खेळीया' लाभलाय, ज्यानं या सीझनला चार चांद लावलेत!"
"रितेश भाऊ, 'बिग बॉस' माझ्यासाठी काय आहे हे तुला माहिती आहे. मला जीवदान देणारा ऑक्सिजन आहे तो. कुणी निंदा कुणी वंदा, पण माझा जीव आहे या शो वर. तू ज्या पद्धतीनं हा शो होल्ड केलास ते पाहून तुझा खुप अभिमान वाटायला लागलाय. हा सिझन जर नव्या उंचीवर गेला, तर त्यात सिंहाचा वाटा हा तुझ्यातल्या निर्मळ 'माणसा'चा असेल. लब्यू."
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.