Suna Yeti Ghara: घर, माणसं आणि नात्याचा खेळ पुन्हा रंगणार; 'सुना येती घरा' छोट्या पडद्यावर लवकरच सुरु होणार नवी मालिका

Suna Yeti Ghara: नाती जपणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही असतं. स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘सुना येती घरा’.
Suna Yeti Ghara
Suna Yeti GharaSaam tv
Published On

Suna Yeti Ghara: नाती जपणं जितकं सुंदर, तितकंच कठीणही असतं. प्रत्येक नव्या नात्यासोबत येतात नव्या अपेक्षा, नवे विचार आणि नव्या स्वप्नांची चाहूल. अशाच नात्यांच्या अनोख्या गुंफणीची गोष्ट घेऊन स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे नवी मालिका ‘सुना येती घरा’. ही मालिका दोन कुटुंबांमधल्या भावनिक संघर्षाची आणि नव्या नात्यांनी घडणाऱ्या बदलांची कथा उलगडणार आहे. स्टार प्रवाह वाहिनी कायमच प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या कथा सादर करत आली आहे. कौटुंबिक नात्यांमधले भावविश्व, त्यातले संघर्ष, प्रेम, त्याग आणि आपलेपणा यांचा सुरेख मिलाफ ‘सुना येती घरा’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

ही कथा आहे शिवनाथ आणि शिरोळे पाटील कुटुंबांची. एका प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबांमध्ये कायमचा दुरावा निर्माण झाला आणि त्या जखमांनी काही कठोर निर्णयांना जन्म दिला. आपल्या मुलांनी प्रेमविवाह करायचा नाही, तर आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करायचं असा नियम घरात ठरवला जातो. मुलं हा निर्णय स्वीकारतात का? नव्या सुना घरात आल्यानंतर घरात सुख-समृद्धी नांदते की नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो? याचं भावनिक आणि रंजक चित्रण मालिकेतून पाहायला मिळणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे, लोकप्रिय अभिनेत्री दीपा परब, शर्मिष्ठा राऊत यांच्यासह अनेक नामवंत कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

Suna Yeti Ghara
Actress Domestic Violence: सिनेसृष्टीत खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीला पतीकडून मारहाण आणि छळ, गुन्हा दाखल; संसार मोडणार?

या नव्या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सासू, सासरे, सुना आणि मुलांना एकत्र बांधून ठेवणारी ही गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडेल. एका घरात तीन सुना आल्यावर कथेची गंमत वेगळीच होईल. परस्पर नातेसंबंधावर भाष्य करणारी ही मालिका हृदयस्पर्शी असेल ही खात्री आहे.’

Suna Yeti Ghara
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेविश्वात शोककळा

अशोक शिंदे म्हणाले, ‘स्टार प्रवाह सोबतची माझी ही नववी मालिका. पुन्हा या कुटुंबात सामील होताना अतिशय आनंद होतोय. माणसं जपणारा, कुटुंबवत्सल असं शिवनाथ हे पात्र मी साकारणार आहे. आपलं कुटुंब पाठीशी असेल तर जगातली कोणतीही लढाई जिंकता येते असा त्याचा ठाम विश्वास आहे. त्याची मुलं म्हणजे त्याचा अभिमान. त्यांच्यावर त्याचा जीव आहे. त्यांना चांगलं वळण मिळावं म्हणून तो कधी कठोरही वागतो, पण मनात कायम काळजी आणि प्रेम आहे. भावनिक संघर्षातून जाणारी ही कथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल.’

दीपा परब छोट्या ब्रेकनंतर पुन्हा मालिका विश्वात कमबॅक करणार आहेत. स्टार प्रवाहसोबतची त्यांची ही पहिलीच मालिका. उमावती या भूमिकेविषयी सांगताना त्या म्हणाल्या, ‘मालिकेची गोष्ट आणि पात्र ऐकताक्षणीच मला भावलं. उमावती स्वभावाने अतिशय प्रेमळ आणि मायाळू आहे. आई आणि पत्नीची कर्तव्यं ती पूर्णपणे जाणते. वडील आणि मुलांमधला संवेदनशील पूल म्हणून ती स्वतःकडे पाहते. प्रचंड श्रीमंतीत वाढूनही तिने शिवनाथसोबत शून्यातून कष्ट करून संसार उभा केला. प्रेक्षकांनाही या मालिकेत स्वतःचं घर दिसेल याची खात्री आहे.’

शर्मिष्ठा राऊत म्हणाली, ‘पुन्हा एकदा खलनायिका साकारतेय. पद्मावतीचा वेगळा दरारा आहे. कपटीपणा तिचा स्थायी स्वभाव आहे. आपली श्रीमंती सगळ्यांना दिसलीच पाहिजे, हा तिचा अट्टहास असतो. बोलताना ती कुणाची पर्वा करत नाही; समोरच्याला काय वाटेल याचा विचारही करत नाही. जवळपास ३ वर्षांनंतर पुन्हा मालिका करतेय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. नात्यांची हळवी, भावनिक आणि मनाला भिडणारी गोष्ट अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका ‘सुना येती घरा’, लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com