
शुक्रवारची रात्र मनोरंजनसृष्टीसाठी अत्यंत दुःखद ठरली. अवघ्या ४२ व्या वर्षी अभिनेत्री शेफाली जरीवालाने या जगातून एक्झिट घेतली. यानंतर बॉलिवूडमधील कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला. कांटा लगा’ या गाण्यामुळे प्रचंड प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीने बिग बॉस १३ मध्ये भाग घेऊनही आपली ओळख निर्माण केली होती. चित्रपट, रिअॅलिटी शो आणि मॉडेलिंग अशा विविध माध्यमांतून तिने अभिनय क्षेत्रात काम केले. तिचा जीवनप्रवास नक्की कसा होता, जाणून घेऊयात थोडक्यात.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल शेफाली जरीवालाचा जन्म डिसेंबर १९८२ रोजी मुंबईत झाला. अभिनेत्री कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये बॅचलर पदवीधर होती. यावरून असे दिसून येते की अभिनेत्री अभिनयाव्यतिरिक्त अभ्यासातही पुढे होती. शिक्षणानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तसेच रातोरात एका गाण्यामुळे प्रसिद्ध झाली.
२००२ साली प्रदर्शित झालेलं ‘कांटा लगा’ हे रिमिक्स गाणं हे तिच्या आयुष्यातलं वळण ठरलं. केवळ ७ हजार रुपयांचं मानधन मिळालं असलं तरी, त्या एकाच गाण्याने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्याकाळी काहींनी या बोल्ड गाण्याला विरोध केला होता. पण या गाण्यामुळे फॅशन आणि पॉप संस्कृतीची व्याख्या बदलली.
‘कांटा लगा’ नंतर तिला अनेक अल्बम्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खूले झाले. 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात तिला बिजली ही छोटी पण प्रभावी भूमिका साकारायला मिळाली. बॉलिवूड व्यतिरिक्त दक्षिण चित्रपट आणि वेबसिरीजमधूनही तिने आपल्या कामाची छाप सोडली. २००८ साली तिने बूगी बूगी नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर ती थेट बिग बॉस सिझन १३ मध्ये दिसली. या शोमध्ये अभिनेत्रीने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती.
बिघडलेल्या प्रकृतीमुळे मोठी झेप घेता आली नाही
पुढे बिघडलेल्या प्रकृतीमुळे तिला कारकिर्दीत मोठी झेप घेता आली नाही. शेफालीने एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, तिला किशोरवयापासून एपिलेप्सीचा आजार होता. या आजारामुळे तिला शूटिंग आणि प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याचा थेट परिणाम तिच्या कारकिर्दीवर झाला.
पहिले लग्न ५ वर्ष टिकले
शेफालीचे वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेत होते. २००४ साली तिने संगीत दिग्दर्शक हरमीत सिंग यांच्यासोबत लग्न केलं होतं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही. २००९ साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अभिनेता पराग त्यागी तिच्या आयु्ष्यात आला. हळूहळू त्यांच्यात प्रेमाचे नाते बहरले. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.
बराच काळ लाईमलाईटपासून दूर राहिल्यानंतर शेफालीने २०१९ साली बिग बॉस १३ मध्ये एन्ट्री घेतली. वाईल्ड कार्ड एन्ट्रीनंतर तिला या शोमुळे खरी ओळख मिळाली. स्पष्टवक्तेपणामुळे तिने अनेकांचे मन जिंकले. सगळ्या स्पर्धकांमध्ये तिने आपली एक वेगळीच छाप सोडली. ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय होती. सामाजिक कार्यांमध्येही तिने अनेकदा सहभाग घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.