Sayaji Shinde: नाशिकमधील तपोवन परिसरातील सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप उसळला आहे. त्यातच सयाजी शिंदे यांनी यावर थेट भाष्य करत सरकारला कठोर शब्दांत सुनावले.
माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, “तपोवनमधील झाडे तोडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक सोहळ्यासाठी झाडांची कत्तल करणे योग्य नाही. तुम्ही एक झाड तोडून दहा झाडे लावू असे विधान करता, पण ते फालतू आहे. आम्ही एकही झाड तोडू देणार नाही. एक झाड वाचवण्यासाठी 100 माणसं उभी राहतील, पण ते झाड तोडू देणार नाही.” त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे पर्यावरण रक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, “सरकार आपलं असूनसुद्धा बेजबाबदार वागते आहे. माझ्या तोंडात शिव्या येतात इतका राग येतोय. मला अनेक फोन येतात आणि लोक नागपूर आणि कर्जत येथील मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचा मुद्दा देखील उपस्थित केला. नागपुरात 45 हजार झाडे तोडणार आहेत, कर्जतमध्येही तसेच. आपल्या डोळ्यासमोर जी झाडे तोडली जात आहेत, ती आपण वाचवली पाहिजेत; नाहीतर माणसं पेटून उठतील.” असे ते म्हणाले.
राज्य सरकारवर निशाणा साधताना सयाजी शिंदे म्हणाले, “सरकारने डोळे उघडले पाहिजेत. तुम्ही किती झाडे लावली त्याचा हिशोब द्या. लोकांनी आवाज उठवला की तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. पण बोलणाऱ्याला बोलता आले पाहिजे. आपल्याकडे लोकशाही आहे की हुकुमशाही हेच समजत नाही. झाडांवर राजकारण करू नका.” या संपूर्ण प्रकरणात सयाजी शिंदे यांनी पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा स्पष्टपणे मांडला असून, तपोवनसह महाराष्ट्रभर सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात जनतेने एकजूटीने उभे राहावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.