Sangeeta Bijlani: सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीच्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात असलेल्या फार्महाऊसवर अज्ञात व्यक्तींनी चोरी केली असून मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली आहे. संगीता काही महिन्यांनंतर 18 जुलै 2025 रोजी या फार्महाऊसला भेट देण्यासाठी आली असता तिच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तिने तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
संगीता बिजलानीचा फार्महाऊस काही काळापासून बंद होता. तिने जेव्हा फार्महाऊसच्या आवारात प्रवेश केला, तेव्हा दरवाजे आणि खिडक्यांच्या ग्रिल्स तुटलेल्या अवस्थेत आढळल्या. घरात प्रवेश करताच सर्वत्र गोंधळ, वस्तूंची तोडफोड आणि अनेक मौल्यवान वस्तू गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. एका टीव्हीला नुकसान पोहोचवले गेले होते तर दुसरा टीव्ही गायब होता. फ्रिज, बेड आणि इतर फर्निचरही मोडून टाकण्यात आले होते. काही फर्निचर तर पूर्णतः नष्ट झाले होते.
घरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेराही तोडला गेला होता, त्यामुळे चोरट्यांची कोणतीही छायाचित्रे किंवा व्हिडीओ फुटेज उपलब्ध नाही. पोलिसांनी पंचनामा करत फार्महाऊसचा संपूर्ण तपास सुरू केला असून चोरी किती मोठ्या प्रमाणात झाली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.
या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडी, चोरी आणि खाजगी मालमत्तेचे नुकसान या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार ही चोरी अलीकडील काही आठवड्यांतील असू शकते. परिसरातील अन्य फार्महाऊस किंवा रहिवाशांकडून माहिती घेतली जात आहे.