Sameer Wankhede vs Aryan Khan: माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांनी अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या वेब सिरीज “द बॅड्स ऑफ बॉलिवूड” विरुद्ध मानहानीची याचिका दाखल केली आहे. या सिरीजचे दिग्दर्शन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने केलं असल्यामुळे प्रकरणाला अधिक वळण लागले आहे. वानखेडेंच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.
वानखेडेंची तक्रार
समीर वानखेडे यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की या सिरीजमधून त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली असून, त्यांचा थेट अपमान करण्यात आला आहे. विशेषतः एका दृश्यात, जिथे “सत्यमेव जयते” म्हटल्यावर लगेचच मध्यम बोट दाखवलं जाते, त्याबद्दल ते आक्षेप घेत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, हे दृश्य त्यांच्या पदाच्या सन्मानाला व वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. वानखेडे यांनी या प्रकरणात रेड चिलीज एंटरटेनमेंट, नेटफ्लिक्स, गूगल, मेटा, एक्स कॉर्प तसेच काही अज्ञात व्यक्तींना प्रतिवादी केले आहे. याचिकेत त्यांनी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली असून, ही संपूर्ण रक्कम ते टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करणार असल्याचेही त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले आहे.
न्यायालयाचा सवाल
या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाने वानखेडेंच्या वकिलांना विचारले की ही मानहानीची याचिका दिल्ली न्यायालयात का दाखल करण्यात आली? या खटल्यासाठी दिल्ली हे योग्य स्थान आहे का?” न्यायालयाने स्पष्ट केले की, वानखेडेंनी याचिकेत दुरुस्ती करून दिल्ली उच्च न्यायालयालात हे प्रकरण ऐकवण्यात यावे याचे योग्य कारणांसह स्पष्ट करणे गरजेचे आहे.
पार्श्वभूमी
२०२१ साली क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली होती. त्यावेळी वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर बरीच चर्चा झाली होती. नंतर या प्रकरणात आर्यन खानला निर्दोष घोषित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर “द बॅड्स ऑफ बॉलिवूड” ही वेब सिरीज तयार करण्यात आली आहे. यातील काही पात्रे आणि घटनांमुळे वानखेडेंची प्रतिमा दुखावली गेल्याचा त्यांचा दावा आहे.
पुढील सुनावणी
सध्या न्यायालयाने वानखेडेंना त्यांची याचिका दुरुस्त करण्यास सांगितले आहे. पुढील तारखेला या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून, याचिकेला पुढे चालना मिळते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.