Ranbir Kapoor And Rishi Kapoor : ऋषी कपूर यांच्या निधनावेळी रणबीर कपूर का रडला नाही ? वडिलांच्या नात्याबद्दलही केला अभिनेत्याने खुलासा
बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर यांचे २०२० मध्ये कर्करोगामुळे निधन झाले. ऋषी कपूर यांना काही दिवस आधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रणबीरला ऋषी कपूर यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये हॉस्पिटलमध्ये पॅनिक ॲटॅक आला होता. त्यामुळे अभिनेत्याला सांगण्यात आले होते की, ऋषी कपूर कधीही जाऊ शकतात. अभिनेत्याने नुकतंच एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्या अखेरच्या दिवसांबद्दल भाष्य केले आहे.
नुकतंच अभिनेत्याने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळेपासूनच मी रडणं बंद केलं होतं. जेव्हा मला वडिलांच्या निधनाचं वृत्त कळलं तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणीही आलं नाही. जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये वडिलांसोबत रात्रीच्या वेळी राहिलो, त्यावेळी मला डॉक्टरांनी ही वडिलांची अखेरची रात्र आहे, असं त्यांनी मला सांगितलं. ते कोणत्याही क्षणी निघून जातील."
"मला आठवतंय, मी एका रुममध्ये गेलो आणि मला अचानक पॅनिक ॲटॅक आला. मला व्यक्तच होताच येत नव्हतं. व्यक्त कसे व्हावे, हेच मला कळत नव्हतं. त्यावेळी माझ्यासमोर खूप काही घडत होतं, पण ते मी सांभाळू शकत नव्हतो. घडणार्या सर्व गोष्टी माझ्या हाताच्या पलीकडे गेल्या होत्या. त्यांच्या जाण्याचा मी शोक केला, असं मला वाटत नाही. उलट माझ्या झालेल्या नुकसानाची जाणीव झाली." असं अभिनेत्याने मुलाखतीमध्ये सांगितले.
शिवाय अभिनेत्याने वडिलांसोबतच्या नात्याबद्दलही भाष्य केलं आहे. नात्याबद्दल बोलताना अभिनेत्याने सांगितले की, "जेव्हा त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आम्ही न्यूयॉर्कमध्ये एक वर्ष एकत्र वेळ घालवला होता. मी तिथे ४५ दिवस राहिलो होतो. एक दिवस ते माझ्याजवळ आले आणि अचानक रडायला लागले. ते माझ्याजवळ केव्हाच रडले नाही. इतकं कमजोर मी माझ्या वडिलांना केव्हाच पाहिलं नव्हतं. तो काळ माझ्यासाठी खूप विचित्र होता."
"माझ्यासमोर जेव्हा वडील रडले, त्यावेळी तो काळ माझ्यासाठी त्रासदायक होता. त्यावेळी मला आमच्यातले अंतर जाणवले आहे. आमच्यातले अंतर कमी करून त्यांना मिठी मारण्याचे धाडस माझ्यात नव्हते. पण मी त्यांना त्यावेळी खूप प्रेम देण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या मते मी एक जबाबदार व्यक्ती आहे. त्यामुळे मला माझ्या वडिलांच्या निधनानंतर रडूच आले नाही. मला आई, बहीण, पत्नी, एक मुलगी आहे आणि वडिलांचेही निधन झाले. आता इतक्या जबाबदाऱ्या असताना मी स्वतःला कमकुवत दाखवू शकतो का? हे सर्व कशाबद्दल आहे हे मला माहित नाही, परंतु मी माझी दुर्बलता दाखविली नाही." असं रणबीर कपूरने मुलाखतीत सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.