
Phule movie controversy: प्रतीक गांधी आणि पत्रलेखा अभिनीत 'फुले' हा हिंदी बायोपिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुळतः ११ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार असलेला हा चित्रपट आता दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आला असून, नवीन प्रदर्शन तारीख २५ एप्रिल २०२५ निश्चित करण्यात आली आहे. या विलंबाचे मुख्य कारण म्हणजे काही ब्राह्मण संघटनांनी चित्रपटातील त्यांच्या समुदायाच्या चित्रणावर घेतलेले आक्षेप.
'फुले' चित्रपट महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित आहे, त्यांनी १९व्या शतकात स्त्री शिक्षणासाठी जात आणि लिंगभेदाच्या विरोधात लढा दिला. तथापि, चित्रपटाच्या ट्रेलरनंतर, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी चित्रपटावर जातीयता भडकवण्याचा आरोप केला आणि 'काळे ब्राह्मण' समुदायाच्या योगदानाची दखल घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्मात्यांसोबत बैठक घेऊन मध्यस्थी केली.
सेंसर बोर्डाने (CBFC) आधी 'यू' प्रमाणपत्र दिलेल्या या चित्रपटात नंतर अनेक बदलांची मागणी केली. यामध्ये जातिव्यवस्थेचा उल्लेख करणारा व्हॉइसओव्हर काढणे, 'महार', 'मांग', 'पेशवाई', आणि 'मनुस्मृती' यांसारखे शब्द वगळणे, तसेच काही संवादांमध्ये सुधारणा करणे यांचा समावेश होता. निर्मात्यांनी ऐतिहासिक दस्तऐवज सादर करून चित्रपटातील दावे योग्य असल्याचे स्पष्ट केले.
दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "आपण अशा भीती आणि शंका मनात ठेवून चित्रपट बनवू शकत नाही... ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यासारख्या निडर दाम्पत्याबद्दल बोलताना अशी भीती बाळगणे अयोग्य आहे." त्यांनी हेही स्पष्ट केले की, ते स्वतः ब्राह्मण असूनही या चित्रपटात ऐतिहासिक सत्यता प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.