Operation Sindoor Movie: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, निकी विक्की भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनियर या निर्मात्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ६ आणि ७ मेच्या रात्री पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईवर आधारित आहे.
'ऑपरेशन सिंदूर' या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तम- नितीन करणार असून, त्याच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक महिला सैनिक वर्दीत, हातात रायफल घेऊन, आपल्या कपाळावर सिंदूर लावताना दिसते. पोस्टरमध्ये टँक, काटेरी तार आणि आकाशात उडणारी लढाऊ विमानेही दाखवण्यात आली आहेत, ज्यामुळे शौर्य, बलिदान आणि देशभक्तीचा संदेश दिला जातो.
या चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या चित्रपटाच्या घोषणेला राष्ट्रभक्तीचा अभिमान मानले, तर काहींनी या घोषणेला 'असंवेदनशील' आणि 'व्यावसायिक फायद्यासाठी केले असल्याची टीका केली. विशेषतः, एआय-जनरेटेड पोस्टरमुळे काहींनी निर्मात्यांवर टीका केली की, एवढे पैश्यांमागे पळू नका. तर, एका नेटकऱ्याने लिहिले, 'लाज वाटू द्या सध्या परिस्थिती का आहे ते पाहा'.
या टीकेनंतर, निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर एक माफीनामा प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी म्हटले की, "आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. आम्ही आपल्या सैनिकांच्या धैर्य, बलिदान आणि ताकदीने प्रेरित होऊन ही कथा मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, आम्हाला समजते की या घोषणेची वेळ आणि संवेदनशीलता काहींना आवडली नाही, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो."
निर्मात्यांनी असेही म्हटले की, "हा केवळ एक चित्रपट नाही हा संपूर्ण राष्ट्राची भावना आहे आणि देशाच्या सामाजिक प्रतिमेचे प्रतीक आहे. आपले प्रेम आणि प्रार्थना नेहमीच शहीदांच्या कुटुंबांसोबत आणि सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांसोबत असतील."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.