भारतीय सिनेसृष्टीमध्ये मानाच्या समाजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची’ घोषणा २४ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आली. ज्या चित्रपटांना आणि कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला होता, त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हा पुरस्कार सोहळा आहे. यावेळी मराठी, बॉलिवूड आणि टॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले.
दिल्लीतल्या विज्ञान भवनामध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण चार मराठी चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ हा पुरस्काराने, तर निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन’ या पुरस्काराने गौरविले. त्यासोबतच शेखर बापू रणखांबे या सांगलीच्या दिग्दर्शकाला ‘रेखा’ या माहितीपटासाठी ‘सामाजिक विषयावरील माहितीपट ज्युरी ॲवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी ‘रेखा’ या माहितीपटाच्या माध्यमातून उत्तम कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यांनी डॉक्यूमेंट्रीमध्ये, रस्त्याशेजारील राहणाऱ्या महिलांच्या आयुष्यातील अडचणी, महिलांच्या मासिक पाळी, आरोग्याच्या वाईट स्थिती या गोष्टींवर भाष्य केलं आहे. या डॉक्यूमेंट्रीला ‘सामाजिक विषयावरील माहितीपट स्पेशल ज्युरी ॲवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी हजेरी लावली होती.
त्यासोबतच पुरस्कार सोहळ्यामध्ये, ‘सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट’ या पुरस्काराने एफटीआयआयचे सदस्य संदीप शहारे आणि चित्रपटाचे दिग्दर्शक हिमांशू प्रजापती यांना ‘थ्रीटूवन’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
बापाच्या पावलावर पाऊल ठेवू पाहणाऱ्या एका मुलाची कथा ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. चित्रपटाची कथा प्रत्येक बाप- मुलाला भावेल अशी आहे. ‘एकदा काय झालं’ या मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट’ या पुरस्कारांतर्गत गौरविण्यात आले. हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये प्रदर्शित झाला असून पुरस्कार स्विकारण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि गायक सलील कुलकर्णी यांनी हजेरी लावली होती.
निशिकांत कुटुंबासोबत असलेला नात्यातील चढउतार, परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण 'गोदावरी' चित्रपटामध्ये मध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा 'गोदावरी' नदी भोवतीच फिरत असून नदीसोबतचे अनोखे नाते या चित्रपटातून उलगडत आहे. या मराठी बहुचर्चित चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ या पुरस्कारांतर्गत दिग्दर्शक निखिल महाजन यांना गौरविण्यात आले. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला असून पुरस्कार स्विकारण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी हजेरी लावली होती.
भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात १९५४ पासून झाली होती. हा पुरस्कार सोहळा भारत सरकारच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून आयोजित केला जातो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.