
अकोला : प्रत्येक कार्यकर्त्याला आपण आमदार व्हावं अशी स्वप्नं कायम पडत असतात. तर प्रत्येक आमदाराला आपण मंत्री व्हावं अशी आस अन मनोमन इच्छा असते. तर प्रत्येक मंत्र्याचा डोळा असतो तो 'मुख्यमंत्री' पदावर. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. अन् तिही चक्क प्रत्येकाला पाहिजे असलेल्या गृहमंत्रीपदाची. अमोल मिटकरी लवकरच 'गृहमंत्र्यां'च्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, ही 'भूमिका' राजकारणाच्या 'रियल लाईफ'मधली नसून. तर ही भूमिका आहे चित्रपटाच्या 'रिल लाईफ'मधली.
अमोल मिटकरी लवकरच एका मराठी चित्रपटात गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच येणाऱ्या 'बिल्लोरी' या मराठी चित्रपटात अमोल मिटकरी गृहमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ते या चित्रपटात आप्पासाहेब पाटील नावाची गृहमंत्र्यांची भूमिका साकारत आहेत. 'सदगृरु इंटरप्राजेस' निर्मित हा चित्रपट असून याचे निर्माते प्रशांत मानकर तर दिग्दर्शक सुनिल शिरसाठ आहेत.
'रियल लाईफ' मध्ये नसलं तरी 'रिल लाईफ'मधल्या या गृहमंत्रीपदाच्या भूमिकेने आमदार मिटकरींना आनंद झाला आहे. गाड्यांचा ताफा, पोलिसांचा कडक सॅल्युट असा मंत्रिपदाचा सर्व तामझाम त्यांना चित्रीकरणादरम्यान काही काळ सुखावून गेला. या चित्रपटाचं शुटींग मार्च २०२४ मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत झालं. अकोल्यातील 'श्री.शिवाजी महाविद्यालयात वर्षभरापूर्वी हे शुटींग पार पडलं. आता हा चित्रपट बनून तयार आहे. नुकताच या चित्रपटाच्या पोस्टर लॉन्चिंगचा कार्यक्रम अकोल्यात पार पडला. खऱ्या आयुष्यातही त्यांना गृहमंत्री बनायला आवडेल, असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. मात्र, आपल्यासारख्या एका सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलाला अजितदादांनी आमदार केलं हेच आपल्यासाठी त्यांचं कधीच न फिटणारे उपकार असल्याचं आमदार मिटकरी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.