मराठी चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. येणारा शुक्रवार म्हणजे २२ मार्च प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. या दिवशी दोन चांगल्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जन्मऋण' (Janma Runn Movie) आणि 'मोऱ्या' (Morya Movie) हे दोन्ही चित्रपट येत्या २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर येत्या शुक्रवारी त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
शहराची स्वच्छता राखण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांवर अनेकदा चर्चा होते. पण त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी मात्र आजही तशाच आहेत. यावर प्रकाश टाकणारा सफाई कर्मचाऱ्यांची व्यथा दाखविणारा 'मोऱ्या हा अत्यंत वेगळा चित्रपट येत्या २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सेंसॉर बोर्डासोबत प्रदीर्घ संघर्ष करून हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता आहे.
एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा 'मोऱ्या' या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. विषयाच्या जातकुळीनुसार धुळे जिल्ह्यातील 'पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. जितेंद्र बर्डेसोबत या चित्रपटामध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
प्रसिद्ध 'दामिनी' या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. ‘जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना 'कलम-5'अंतर्गत तुरुंगवासही भोगाव लागतो.
समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे केवळ याच एका सद्भावनेने ‘जन्मॠण’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केलेले आहे. २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के, अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण हे कालाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाला संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.