Nagraj Manjule Movie: पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या कॉपीराईट वादाच्या पार्श्वभूमीवर ‘खाशाबा’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दावा सुरू असतानाही चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यामुळे न्यायालयाने निर्माती ज्योती देशपांडे, दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शन यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची तातडीची सुनावणी ८ मे रोजी होणार आहे.
खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची घोषणा डिसेंबर २०२४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर लेखक संजय दुधाणे यांनी त्यांच्या पुस्तकावरील कॉपीराईट हक्कांचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली. दुधाणे यांच्या म्हणण्यानुसार, २००१ पासून त्यांच्या पुस्तकाचे कॉपीराईट हक्क त्यांच्या नावावर असून त्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्रही त्यांच्या जवळ आहे.
या वादात नवे वळण आले
जेव्हा १ मे रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. दावा प्रलंबित असतानाही ट्रेलर प्रदर्शित केल्याने दुधाणे यांच्या वकिलांनी २ मे रोजी चित्रपट प्रदर्शनावर स्थगिती आणण्यासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने या अर्जाची दखल घेत संबंधितांना नोटीस पाठवत सुनावणी निश्चित केली आहे.
दरम्यान, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनीही लेखक संजय दुधाणे यांच्याविरोधात ५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसान दावा दाखल केला आहे. मात्र या दाव्यातील शपथपत्रातच चित्रपटासाठी काही संदर्भ दुधाणे यांच्या पुस्तकावर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शपथपत्रातील काही पानांवर दुधाणे यांचा कथालेखक म्हणून उल्लेख असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या सर्व घडामोडींमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मंजुळे यांनी चित्रपट स्वतंत्ररित्या तयार केल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे त्यांच्या शपथपत्रातील उल्लेखामुळे वाद अधिकच चिघळला आहे. लेखक संजय दुधाणे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध निर्माते किंवा स्टुडिओला नसून केवळ कॉपीराईट हक्कांबाबत आहे. सध्या प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने अधिक भाष्य करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.