मराठी सिनेसृष्टीमध्ये खलनायकाच्या भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या रविंद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून रविंद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्यांवर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आलं होतं. मात्र, बुधवारी पहाटे त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
रविंद्र बेर्डे नेहमीच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत होते. ते एक मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते असून, दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे मोठे बंधू देखील होते. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्रित काम सुद्धा केले आहे. रविंद्र यांनी वयाच्या २० व्या वर्षी मराठी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवले होते. विसाव्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी नभोवाणी म्हणजेच रेडिओमध्ये काम करत होते. १९६५ पासून रविंद्र यांनी नाटकामध्ये काम करायला सुरूवात केली.
३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये, काही हिंदी चित्रपटांमध्ये तर जवळपास ३१ नाटकांमध्ये रविंद्र बेर्डे यांनी काम केले आहे. रविंद्र बेर्डे यांची आणि त्या काळातले काही आघाडीतल्या अभिनेत्यांची जोडी प्रचंड हिट ठरली. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, विजय चव्हाण, भरत जाधवसह अनेक प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांसोबत जोडी हिट ठरली. रविंद्र बेर्डे यांनी गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी, थरथराट, हमाल दे धमाल, धडाकेबाज सह बऱ्याच चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयाचे आजही प्रेक्षकांकडून कौतुक होते.
१९९५ मध्ये, ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकावेळी रविंद्र यांना हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर २०११ मध्ये, रविंद्र यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत ते या आजारासोबत लढा देत होते, मात्र आज त्यांच्या या लढ्याला अपयश आले. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार होता. रविंद्र यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.