
महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत मराठमोळ्या अभिनेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'आग्रातून सुटका करून घेण्यासाठी पेटाऱ्यांचा वापर करण्यात आला नव्हता. तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परत आले होते.', असा खळबळजनक दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत आले असून यामुळे वाद निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल सोलापूरकर यांनी सांगितले की, 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. आग्र्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती.
तसंच, 'मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण आणि पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडं रंगवून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.', असे वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये असे लिहिले की, 'हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे. शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत अन् हिरकणी बुरूज कुठे आहे.', हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल.', अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमोल मिटकरी यांनी सांगितले की, 'राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु "हैवान" असल्याच सिद्ध केलंय.छ.शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान,आपल्या विकृत मानसिकतेतुन इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतल्या जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातुन स्वकर्तुत्वावर निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.