Dilip Prabhavalkar Dashavatar: मराठी रंगभूमी आणि सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर त्यांच्या दशावतार या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल आणि कुटुंबीयांशी संबंधित आठवणी दशावतार या चित्रपटानिमित्त झालेल्या एका मुलाखतीत सांगितल्या. मध्यवर्गीय कुटुंबात वाढलेले दिलीप प्रभावळकर हे शिक्षणाने विज्ञान शाखेचे पदवीधर आहेत. सुरुवातीला त्यांनी फार्मास्युटिकल विभागात रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले. परंतु नाटक, मालिका आणि सिनेमांची ओढ त्यांना कायम आकर्षित करत होती.
मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी ते नाटक आणि काम एकत्र करायचे. या धावपळीच्या काळात त्यांच्या वडिलांनी मुलाच्या कामाकडे लक्ष दिले. प्रभावळकर म्हणाले, “बाबा एके दिवशी शांतपणे म्हणाले, 'गेले काही दिवस मी तुझी धावपळ बघतोय, तू यातच करिअर का करत नाहीस?” या प्रश्नाने प्रभावळकर थोडेसे चिडले, कारण त्यावेळी त्यांना अभिनय क्षेत्र हे अस्थिर आणि बेभरवशाचे वाटत होतं. तरी देखील वडिलांनी कोणताही दबाव न आणता फक्त आपले मत व्यक्त केले होते.
याच विचारांमुळे दिलीप यांनी अखेरीस अभिनयाला पूर्णवेळ व्यावसायिक क्षेत्र म्हणून स्वीकारले. ‘हसवा फसवी’ या नाटकानंतर त्यांच्या कारकिर्दीला मोठा वेग मिळाला आणि ते चाळिशीत असतानाच ‘फुलटाईम’ अभिनेता बनले. मात्र हा क्षण त्यांच्या वडिलांना पाहायला मिळाला नाही, ही एक हळवी आठवण त्यांनी मुलाखतीत व्यक्त केली. “मी कलाकार झालो; पण ते बघायला बाबा नव्हते,” असे ते भावुक होत म्हणाले.
दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या प्रवासात कुटुंबाची साथ, वडिलांचा विश्वास आणि स्वतःची मेहनत या सर्वांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले. त्यांचा हा प्रामाणिक अनुभव आजच्या पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरतो. दिलीप प्रभावळकर य़ांचा नुकताच प्रदर्शित झालेला दशावतार हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटात ८१ व्या वर्षी दिलीप प्रभावळकर यांनी दमदार अॅक्शन सीन साकारला आहे.