Prasad Khandekar: सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे काही क्वचितच कार्यक्रम आहे. त्यातील एक कार्यक्रम म्हणजे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अनेक सेलिब्रिटी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे प्रसाद खांडेकर.
प्रसाद एक उत्तम अभिनेता आहे, सोबतच तो उत्तम लेखक देखील आहे. त्याचे ‘कुर्रर्रर’ या विनोदी नाटकाचे सध्या जोरदार महाराष्ट्रात शो सुरु आहेत. सोबतच प्रसाद ‘एकदा येऊन तर बाघा... रिटर्न जाणाराच नाही’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. इथपर्यंत पोहोचलेला प्रसाद कशाप्रकारे इथपर्यंत मजल मारु शकला याबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. आपल्या सिनेविश्वातील करियरला कशी सुरुवात केली यापबद्दलही त्याने सांगितले.
मुलाखतीत प्रसाद खांडेकर म्हणतो, ‘माझ्या वडिलांना नाटकांची प्रचंड आवड होती. मीही वडिलांसोबत नाटक पाहण्यासाठी जायचो. तिथूनच मला या क्षेत्राची ओढ निर्माण झाली होती. मी सिनेविश्वात येण्यापूर्वी क्रिकेटपटू होतो. मुंबईमधून अंडर १४साठी माझी निवड झाली होती. इयत्ता दहावीनंतर माझा एक मोठा अपघात झाला. त्यानंतर माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळत गेले.’
पुढे प्रसाद म्हणतो, ‘जवळपास तीन महिने केईएम रुग्णालयामध्ये माझ्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर माझ्या आयुष्याला बरंच वळण मिळालं. त्यानंतर मी माझ्या वडिलांबरोबर भरत जाधवचं ‘श्रीमंत दामोदर पंत’हे नाटक बघायला गेलो होतो. त्यावेळी मला असं वाटलं की हे क्रिकेट सारखंच आहे. इथे तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला समोरासमोर पोचपावती मिळते.’
पुढे प्रसाद म्हणतो, ‘माझ्या वडिलांना नाटकाची आवड होती, पण माझ्या कुटुंबातून कोणीही या क्षेत्रामध्ये नव्हतं. पण या क्षेत्राबाबत मला आवड होती. कांदिवलीच्या ‘ठाकुर महाविद्यालया’मध्ये मी शिक्षण घेत होतो. या महाविद्यालयामध्ये एकांकिका वगैरे हा प्रकार काहीच नव्हता. त्या महाविद्यालयात मराठी मुलं फार कमी होती. मी त्या कॉलेजमध्ये १० ते १५ मुलं जमा केली आणि मराठी कलामंच नावाचा ग्रुप तयार केला. ’
‘या ग्रुप अंतर्गत मी एकांकीका करू लागलो. इथूनच माझ्या अभिनयक्षेत्राला सुरुवात झाली. ‘आम्ही पाचपुते’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक होतं.’ अशा शब्दात प्रसादने क्रिकेटर ते कलाकार हा अनुभव सांगितला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.