
Jay Bhim Panther: दलित, जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा 'जयभीम पँथर - एक संघर्ष' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने ११ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
भदंत शीलबोधी थेरो यांच्या नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनद्वारे निर्मिती होत असलेला "जयभीम पँथर" एक संघर्ष हा महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आयु. रामभाऊ तायडे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संपूर्ण बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील भारत निर्माण करण्यासाठी चित्रपट, मालिका अशा माध्यमातून नवनिर्मिती करण्याचा या निर्मिती संस्थेचा मानस आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे. प्रोजेक्ट हेड म्हणून संतोष गाडे, कार्यकारी निर्माता बाबासाहेब पाटील आणि कलादिग्दर्शक म्हणून प्रकाश सिंगारे यांनी काम पाहिले आहे.
'जयभीम पँथर - एक संघर्ष' चित्रपटात अभिनेता गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, मिलिंद शिंदे, अभिजीत चव्हाण, सोनाली पाटील, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी, प्रवीण डाळिंबकर, विनय धाकडे, प्रियांका उबाळे अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटातील "माझ्या भीमाची जयंती' हे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील गीत चांगलेच गाजत आहे. चित्रपटाचे संगीत, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून ज्याचे लेखन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे.
दलित, शोषित बहुजन समाजातील घटकांवर अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या प्रत्येक बहुजन संघटनेची, आणि त्यांच्या संघर्षाची सर्वसमावेशक कहाणी 'जयभीम पँथर - एक संघर्ष' हा चित्रपट मांडतो. जातींमधील संघर्ष, दलितांमधील अत्याचार, बहुजन राजकारण, शिक्षण याचं चित्रण करतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व हा चित्रपट अधोरेखित करतो. आजच्या काळात राजकारण बदलत असताना, जातीय संघर्ष वाढत असताना एक वेगळा सर्वसमावेशक विचार देण्याचा प्रयत्न 'जयभीम पँथर - एक संघर्ष' हा चित्रपट करत असल्याचं ट्रेलरवरून दिसतं आहे. अनुभवी अभिनेत्यांचा अभिनय, कसदार लेखन दिग्दर्शनांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणेल यात शंका नाही. दमदार ट्रेलरमुळे आता ११ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.