
Makarand Anaspure: साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या 'गुढीपाडवा' या आपल्या हिंदू नववर्ष दिवसाचे औचित्य साधत, 'शेलार मामा फाउंडेशन' आयोजित 'चिरायू' हा कलाकारांच्या सन्मानाचा आणि नात्याच्या उत्सवांचा सोहळा मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला. यंदाचं हे १८ वर्ष असून ९०च्या दशकातील ज्येष्ठ कलाकारांनी 'चिरायू' ची मुहूर्तमेढ रोवली होती. कालांतराने खंडित झालेल्या या परंपरेला पुन्हा एकदा झळाळी आणली ती म्हणजे लोकप्रिय कलाकार सुशांत अरुण शेलार यांनी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २००६ पासून 'शेलार मामा फाउंडेशन'द्वारा आयोजित 'चिरायू' या यशस्वी उपक्रमाला प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांची देखील मोलाची साथ लाभली. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्ताच्या पूर्वसंध्येला शुक्रवार २८ मार्च रोजी हा नवोन्मेष सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.
मराठी कलाक्षेत्र हे जितके प्रयोगशील, तितकेच समाजाभिमुख राहिले आहे. 'नाम फाउंडेशन' द्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांना यंदाचा 'पर्यावरण स्नेही' हा पुरस्कार सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. शिवाय दरवर्षीप्रमाणे मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जिओ हॉटस्टारचे हेड गौरव गोखले, कार रेसिंग क्षेत्रात भारताचे प्रतिनिधित्व करणारी लोकप्रिय अभिनेत्री मनीषा केळकर, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून गणल्या जाणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रात यशस्वी २५ वर्ष पूर्ण करणाऱ्या श्री. गणेश आचवल आणि पडद्यामागील कलावंत विभागात केशभूषेसाठी अमिता कदम', आर्ट स्पॉट करीता मारुती मगदूम, स्पॉट दादा - दशरथ सावंत आदी कलाकार-तंत्रज्ञांना 'चिरायू' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मकरंद अनासपुरे यांनी यावेळी, ''हा सन्मान केवळ माझा नाही संपूर्ण 'नाम फाऊंडेशन' आणि आमच्या प्रयत्नांना दिलेली महाराष्ट्र शासनाची साथ अशा साऱ्यांचा आहे. मी हा पुरस्कार प्रातिनिधिक स्वरूपात स्विकारत आहे. गुढीपाडव्याला कुठलीही चांगली गोष्ट जर घडली तर ती वृद्धिंगत होते हा माझा अनुभव आहे. नाम फाऊंडेशनमार्फत असंख्य दुर्लक्षित प्रश्न समाजासमोर / शासनासमोर आणण्यासाठी 'चिरायू' संसथेने दिलेला हा पुरस्कार नक्कीच आमचं बळ वाढवणारा आहे.'' असं आपलं मनोगत व्यक्त करत आशिष शेलार (महाराष्ट्र राज्य, सांस्कृतिक कार्यमंत्री) आणि सुशांत शेलार (शेलार मामा फाऊंडेशन) यांचे आभार मानले.
उपस्थित कलाकार आणि मान्यवरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार म्हणाले, ''सांस्कृतिक कार्यमंत्री पदभार घेतल्यापासून हा पहिलाच सन्मान सोहळा आहे ज्यात पडद्यामागील कलाकारांना गौरवण्याकरिता मला आमंत्रित करण्यात आलं आहे आणि याचा मला फार आनंद आहे. कला आणि समाजसेवेचा घातलेला हा अनोखा मेळ खरोखरच स्तुत्य असून सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या माझ्या मित्रवर्य सुशांत शेलार आणि अक्षय बर्दापूरकर यांचे आभार मानतो. 'चिरायू' सोहळा पिढ्यानपिढ्या घडत राहो यासाठी लागेल ती मदत शासन नक्की करेल."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.