दिलजीत दोसांज आपल्या अभिनयाबरोबरच गायनासाठी सुप्रिसद्ध आहे. दिलजीत जगातल्या वेगवेगळ्या देशांत कॅान्सर्ट करत असतो. त्याच्या कॅान्सर्टला लाखो चाहत्यांची गर्दी होते. भारतातही वेगवेगल्या शहरांत त्याचे कॅान्सर्ट होत असतात. काही दिवसांपूर्वी दिलजीत दोसांजचा 'दिल-लुमिनाटी' कॅान्सर्ट दिल्लीत झाला होता. त्यावेळी या कॅान्सर्टच्या तिकिटांवरुन वाद झाला होता. त्यातच आता पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांज हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
दिलजीत दोसांजची शुक्रवारी हैदराबाद येथे दिल -लुमिनाटी कॅान्सर्ट होणार आहे. त्यातच तेलंगणा पोलिसांनी दिलजीत दोसांजचा कॅान्सर्ट आयोजकांना कायदेशीर नोटीस पाठवत मोठा झटका दिला आहे. नोटिशीत कॅान्सर्टसाठी काही अटींसह नियमावली देण्यात आली आहे. कॅान्सर्टमध्ये ड्रग्स, दारु, आणि हिंसा पसरवणारे गाणे न गाण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच त्यांचा प्रचार करण्यापासून रोख लावण्यात आली आहे. 'पटियाला पैग' आणि 'पंच तारा' सारख्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी दिलजीत दोसांजचा दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअम मध्ये 'दिल-लुमिनाटी' कॅान्सर्ट झाला होती. या कॅान्सर्टमध्ये ड्रग्स, दारु आणि हिंसेला प्रवृत्त करणारी गाणी गायली होती, अशी तक्रार चंडीगडचे प्रोफेसर पंडितराव धरनेवर यांनी पोलिसांकडे केली होती. याचे पुरावे म्हणून कॅान्सर्टचे व्हिडिओज पोलिसांना देण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेत तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ७ नोव्हेंबरला दिल-लुमिनाटीच्या आयोजकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एका प्रौढ व्यक्तीने १४० डेसिबलपेक्षा जास्त ध्वनिच्या संपर्कात येऊ नये आणि लहान मुलांनी १२० डेसिबलपेक्षा जास्त ध्वनीच्या संपर्कात येऊ नये अन्यथा आरोग्याला हानी पोहचू शकते. म्हणून १३ वर्षाखालील मुलांना स्टेजवर बोलवू नये कारण स्टेजवर हा साऊंड प्रेशर १२० डेसिबलपेक्षा जास्त असतो. तुमच्या कॅान्सर्टमध्ये १३ वर्षाखालील मुलांना परनावगी देण्यात आली आहे, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
लाइव्ह शो मध्ये ड्रग्स् , दारु आणि हिंसेला प्रोत्साहन देणारी गाणी गाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच या कॅान्सर्टमध्ये लहान मुलांना स्टेजवर बोलवण्यात येऊ नये. असे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तसेच कॅान्सर्टमध्ये गाण्याचे साऊंड प्रेशर आणि लाइट्स हे लहान मुलांसाठी हानिकारक आहे. म्हणून लहान मुलांना स्टेजवर बोलवू नये असे सांगण्यात आले आहे. दिलजीत हा सध्या हैदराबादमध्ये असून, तो कॅान्सर्टच्या अगोदर हैदराबादमध्ये फिरताना दिसत आहे. कॅान्सर्ट १५ नोव्हेंबरला संध्याकाळी होणार आहे.
Edited by: Priyanka Mundinkeri