बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) दोन दिवसांपूर्वी स्वत:च्या निधनाची अफवा पसरवली होती. ही बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांसह सर्वांना मोठा धक्का बसला होता. पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाल्याची ही बातमी होती आणि या बातमीमुळे एकच खळबळ उडाली होती. पण ही बातमी अफवा निघाली. पूनम पांडेने स्वत: सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मी जिवंत असल्याचे सांगितले.
पूनम पांडे जिवंत असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना बरं वाटलं पण आता अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. पूनम पांडेच्या या कृतीचा अनेकांनी सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान आता पूनम पांडेचं जुनं ट्वीट व्हायरल होत आहे. त्यावेळी अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिकेचे निधन झाल्याची अशीच एक खोटी बातमी व्हायरल झाली होती. त्यावेळी पूनम पांडेने सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांना सुनावलं होतं.
झालं असं होतं की, २०१२ मध्ये प्रसिद्ध हॉलिवूड गायिक-अभिनेत्री मॅडोनाच्या निधनाची बातमी समोर आली होती. सोशल मीडियावर तिच्या मृत्यूच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यावेळी 'RIP Madonna' हा ट्रेंड सुरु झाला होता. तेव्हा पूनम पांडेने अशा बातम्या पसरवणाऱ्यांना फटकारलं होतं. अशापद्धतीने कुणाच्या निधनावर जोक करू नये असे मत तिने व्यक्त केले होते. या ट्विटमध्ये पूनम पांडेने असे लिहिले होते की, 'RIP Madonna ट्रेंडिंग होत आहे. असं कोण करु शकतं. प्लीज कुणाच्या निधनाबाबत असे जोक करु नका.'
अशामध्ये आता पूनम पांडेनेच स्वत:च्या निधनाची अफवा पसरवली. त्यामुळे २०१२ मध्ये लोकांना सल्ला देणारी पूनम पांडे हिच का असा प्रश्न नेटिझन्सला बसला आहे. त्यामुळे नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. त्यांनी या ट्विटचा रेफरन्स घेत पूनम पांडेची चांगलीच शाळा घेत तिला जाब विचारला आहे. अनेकजण तिला 'डबल स्टॅण्डर्ड' म्हणत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट्स करत लिहिले की, '12 वर्षांनंतर 'या' नैतिकतेचे काय झाले? अशा प्रश्न विचारला आहे. अशारितीने पूनम पांडेने १२ वर्षांपूर्वी केलेलं ट्वीट आज तिच्यावर उलटलं आहे.
दरम्यान, पूनम पांडेच्या मृत्यू्च्या वृत्तानंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले होते. पण रविवारी पूनमने एक व्हिडीओ पोस्ट करत आपण जीवंत असल्याचे सांगितले होते. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितले की, 'तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजागा आहे. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.