बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' अर्थात अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आज आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिद कपूर हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे ज्याच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. शाहिद कपूरचे वय ४३ जरी असले तरी तो आजही २३ वर्षांचा वाटतो. त्यांचा फिटनेस, त्याचा क्युटनेस सर्वांना प्रचंड आवडतो. शाहिद कपूरचा सोशल मीडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे. बॉलिवूड चित्रपटांसह त्याने डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील नाव कमावले आहे. त्यांची पहिलीच 'फर्जी' वेबसीरिज देखील सुपरहिट ठरली. शाहिद कपूरचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी त्याला १०० ऑडिशनमध्ये रिजेक्शन मिळाले होते. शाहिद कपूरच्या वाढदिवसानिमित्त (Shahid Kapoor Birthday) आज आपण त्यांचे फिल्मी करिअरबद्दल जाणून घेणार आहोत...
1981 मध्ये नवी दिल्ली येथे जन्मलेला शाहिद कपूर हा फिल्मी बॅकग्राऊडमधून आला आहे. त्याचे वडील पंकज कपूर हे देखील टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज अभिनेते आहेत. शाहिद कपूरने बॉलिवूडमध्ये खूप मोठा पल्ला गाठला आहे. यादरम्यान त्याने त्याच्या करिअरमध्ये खूप चढ-उतार देखील पाहिले आहेत. क्रिती सेनॉनसोबत 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाच्या यशाचा आनंद लुटणाऱ्या शाहिद कपूरसाठी हे दिवस दुहेरी आनंदाचे दिवस आहेत. शाहिद आज स्टारडमच्या टॉप स्थानीअसला तरी एक काळ असा होता जेव्हा त्याला कोणीही ओळखत नव्हते. 100 हून अधिक ऑडिशनमध्ये त्याला रिजेक्शन मिळाले होते. 2003 मध्ये आलेल्या 'इश्क विश्क' चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यापूर्वी शाहिदने जवळपास 100 ऑडिशन्स दिले. पण त्याला यश मिळाले नाही.
अनुपमा चोप्राच्या मुलाखतीदरम्यान शाहिदने सांगितले होते की, जवळपास 100 ऑडिशननंतर त्याला अमृता राव आणि शेनाज ट्रेझरीवालासोबत 'इश्क विश्क' चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'ताल' आणि 'दिल तो पागल है' सारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून शाहिद कपूरचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला. 'ताल'मध्ये तो ऐश्वर्या राय बच्चनसोबत डान्स करताना दिसला होता. डान्सर म्हणून या सुरुवातीच्या अनुभवाने शाहिद कपूरला भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता बनण्यास खूप मदत केली.
शाहिद कपूर त्याच्या व्यक्तिरेखांना इतकं गांभीर्यानं घेतो की त्याच्या पात्राला पडद्यावर खरा दिसण्यासाठी आवश्यक ते सर्व तो करतो. तसेच 'मौसम' चित्रपटात पायलटची भूमिका साकारण्यासाठी शाहिदने अमेरिकन एफ-16 सुपर वायपर विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तो पहिला बॉलिवूड अभिनेता आहे जो फायटर जेट उडवण्यास सक्षम आहे. शाहिद कपूर आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्यात कौटुंबिक संबंध असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. शाहिद हा नसीरुद्दीन शाह यांचा सावत्र पुतण्या आहे. कारण त्याची सावत्र आई सुप्रिया पाठक ही नसीरुद्दीन शाह यांच्याशी लग्न झालेल्या रत्ना पाठक शाह यांची बहीण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.