बॉलिवूड (Bollywood) अभिनेता परेश रावल (Paresh Rawal) लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'शास्त्री विरुध्द शास्त्री' (Shastri Viruddh Shastri) या चित्रपटामध्ये ते आजोबांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आजी-आजोबा आणि नातवाच्या नात्याची अनोखी कहाणी या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा इमोशनल ट्रेलर (Shastri Viruddh Shastri Trailer) प्रदर्शित झाला आहे.
Viacom18 Studios ने सोशल मीडियावर त्यांच्या बहुप्रतिक्षित फॅमिली ड्रामा चित्रपट 'शास्त्री विरुध्द शास्त्री' चा ट्रेलर रिलीज केला आहे. परेश रावल आणि बंगाली चित्रपटसृष्टीत एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या मिमी चक्रवर्ती यांच्याशिवाय या चित्रपटात अमृता सुभाष, मनोज जोशी, नीना कुलकर्णी आणि शिव पंडित यांच्यासारखे दमदार कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा संपूर्ण चित्रपट 7 वर्षांच्या मोमोजी या मुलाभोवती फिरतो. जो आपल्या पालकांमधील भावनांच्या कठीण भोवऱ्यात अडकतो. मुलाचे आजी-आजोबाही त्याच्यावर खूप प्रेम करतात. या मुलावर कोणाचा अधिकार आहे? असा प्रश्न निर्माण होतो आणि मुलाचे आई-वडील आणि आजी-आजोबा कोर्टात धाव घेतात. हा मुलगा नेमका कोणाकडे राहणार हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.
हा चित्रपट प्रेमाच्या स्वरूपावर गंभीर प्रश्न उपस्थित करतो. तसंच, कायद्याला मुलाचे भविष्य ठरवण्याचा अधिकार कितपत आहे हे देखील चित्रपटातून विचारले आहे. 'शास्त्री विरुध्द शास्त्री' हा भावनिक कोर्टरूम ड्रामावर आधारित चित्रपट आहे. ज्यामध्ये प्रेमाची गुंतागुंत, त्याच्याशी संबंधित जबाबदाऱ्या आणि पालकांचे हक्क यावर सुंदरपणे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Viacom18 Studios ने नेहमीच दर्जेदार कथा स्क्रीनवर आणण्याचा आणि सर्व माध्यमांमध्ये उत्तम कथा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. 'शास्त्री विरुध्द शास्त्री' या चित्रपटाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी कथा पडद्यावर सशक्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. समकालीन आणि विचार करायला लावणाऱ्या कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल असा विश्वासही निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. नंदिता रॉय आणि शिबोप्रसाद मुखर्जी यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केलेला 'शास्त्री विरुध्द शास्त्री' हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.