बॉलिवूडचा (Bollywood) 'खिलाडी' अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) ही ९० च्या दशकातील सुपरहिट जोडी आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि हे चित्रपट सुपरहिट देखील ठरले.
'मोहरा', 'मैं खिलाडी तू अनारी', 'खिलाडी का खिलाडी', 'बारूद', 'किंमत' या चित्रपटामध्ये अक्षय आणि रवीना यांनी काम केले आहे. आता दोघांच्याही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ही जोडी तब्बल २० वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.
अक्षय कुमार आणि रवीना टंडन आगामी 'वेलकम टू जंगल' (Welcome to Jungle) या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच अक्षय कुमारने एका मुलाखतीत याविषयी खुलेपणाने खुलासा केला आहे. २० वर्षांनंतर आपली आवडती जोडी पुन्हा मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याचे कळताच अक्षय आणि रवीनाच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरूवात होणार आहे.
अक्षय कुमारने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'आम्ही लवकरच 'वेलकम टू जंगल' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहोत. आम्ही दोघांनी मिळून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटाच्या शूटिंगची मी आतुरतेने वाट पाहत आहे. बऱ्याच दिवसांनी आम्ही मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहोत.' अक्षय कुमार आणि रवीना टंडन शेवटी २००४ मध्ये रिलीज झालेल्या 'पोलीस फोर्स एन इनसाइड स्टोरी' या चित्रपटात काम केले होते.
दरम्यान, ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय अफेअर्सबद्दल बोलायचे झाले तर तेव्हा अक्षय कुमार आणि रवीना टंडनच्या अफेअरचा नक्कीच उल्लेख केला जातो. दोघांनी ९० च्या दशकातील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढल्याचे बोलले जाते. हे प्रकरण इतके वाढले होते की, अक्षय कुमार आणि रवीना टंडनची एंगेजमेंटही झाली. मात्र, लग्न होण्यापूर्वीच त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अक्षय कुमारने २००१ मध्ये ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. तर रवीना टंडनने २००४ मध्ये बिझनेसमन अनिल थडानीसोबत लग्न केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.