'12th फेल' (12th Fail Movie) फेम अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) सध्या त्याच्या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. विक्रांत मेस्सीचा हा चित्रपट सुपरहिट ठरला असून बॉक्स ऑफिसवर त्याने बक्कळ कमाई केली. ज्याचे जास्त नाव होते तो जास्त बदनाम देखील होतो. विक्रांत मेस्सीसोबत असंच काहीसं घडलं होतं. '12th फेल' चित्रपटामुळे लाखो लोकांचे मन जिंकणारा विक्रांत मेस्सी त्याच्या जुन्या पोस्टमुळे वादामध्ये अडकला आहे. या वादग्रस्त पोस्टनंतर विक्रांत मेस्सीने समोर येत जाहीर माफी मागितली आहे.
विक्रांत मेस्सीचा '12th फेल' हा चित्रपट २०२३ मधील सर्वात जास्त चर्चेत राहिलेला आणि प्रसिद्धी मिळालेला चित्रपट आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाला अजूनही प्रेक्षकांकडून पसंती मिळत असून सोशल मीडियावर विक्रांत मेस्सीवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर विक्रांत मेस्सीचीच चर्चा सुरू आहे. अशामध्ये विक्रांत मेस्सीचे जुने ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून त्याच्यावर टीका केली जात आहे. ६ वर्षांपूर्वी त्याने हे ट्वीट केले होते. हे ट्वीट त्याला चांगलेच महागात पडले. आता त्याने माफी मागितली आहे.
६ वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेवर विक्रांत मेस्सीने संताप व्यक्त केला होता. त्याने यासंदर्भात ट्विटरवर एका कार्टुनचा फोटो शेअर केला होता. या कार्टुन फोटोमध्ये माता सीता हातामध्ये न्यूजपेपर घेऊन भगवान राम यांना काही तरी सांगताना दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्याने लिहिले होते की, 'मला खूप आनंद आहे की माझं अपहरण रावणाने केले होते. तुमच्या भक्तांनी नाही.' याचाच अर्थ सीतामाता भगवान रामाला हे वाक्य बोलत असल्याचे विक्रांतने लिहिले होते.
विक्रांत मेस्सीची ही पोस्ट पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले होते. त्यांनी विक्रांतची शाळा घ्यायला सुरूवात केली होती. अशामध्ये विक्रांतने रामभक्तांची माफी मागितली. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स अर्थात ट्विटरवर माफीनामा शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले की, '२०१८ मधील माझ्या एका ट्विटच्या संदर्भात मला काही तरी सांगायचे आहे. हिंदू समाजाला दुखावण्याचा, बदनामी करण्याचा किंवा त्यांचा अपमान करण्याचा माझा हेतू कधीच नव्हता.'
त्याने या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'परंतु जेव्हा मी चेष्टेमध्ये केलेल्या ट्विटचा विचार करतो, तेव्हा लक्षात येते की एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र शेअर न करताच मला हे साांगता आले असते. जे दुखावले आहेत त्या सर्वांची मी नम्रपणे माफी मागू इच्छितो. तुम्ही मला ओळखता. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो. आपण सर्वजण वेळेनुसार मोठे होतो आणि आपल्या चुकातून शिकतो. ही माझी चूक आहे.' विक्रांत मेस्सीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.